ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी पुन्हा आक्रमक; विरोधकांचा नवा प्लान आला समोर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज इंडिया आघाडीने ऑनलाइन बैठकीचे आयोजन केलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने पुन्हा वज्रमुठ आवळली आहे. कथित मतचोरीच्या मुद्दयावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा आंदोलनाचा प्लान आखला आहे. या आंदोलनासाठी इंडिया आघाडीचे नेत्यांची आज सायंकाळी ऑनलाइन बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत रुपरेषा आखली जाणार असल्याची माहिती मिळतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, कथित मतचोरी मुद्यावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज संध्याकाळी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची ऑनलाईन बैठक होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीत आंदोलनांच्या पुढील रोडमॅपवर सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच बैठकीत आगामी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या भव्य रॅलीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. गेल्या आठवड्यातच ‘मतचोरी’च्या आरोपांसंबंधीचे हे आंदोलन थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले होते. ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत विरोधी पक्ष या बैठकीनंतर देशभरात आंदोलनांची दिशा ठरवण्याची शक्यता आहे.
विरोधकांची रणनीती काय?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 13 ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांना चहासाठी निमंत्रण दिलं होतं. या बैठकीत कथित मतचोरी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्लान ठरला. या मुद्द्यावरून सातत्याने विरोध करत राहण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. मतदार यादीमधील घोळ आणि कथित बनावट मतदारांचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होत असल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेतली. यावेळी रस्त्यावर मोर्चा काढत राष्ट्रपतींच्या निवासस्थानी पोहोचले होते. तर इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टावरही मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये लोक प्रतिनिधींसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला होता. खरंतर इंडिया आघाडीने सरन्यायाधीशांच्या भेटीची वेळ मागितली होती. परंतु त्यांनी भेट नाकारत याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे इंडिया आघाडीने मोर्चा काढत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती.
