
इराण आणि इस्त्रायल युद्धा दरम्यान बंकर बस्टर बॉम्बची चर्चा झाली. इराणमधील अणू केंद्र नष्ट करण्यासाठी अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला. इराणच्या भूमिगत असलेल्या फोर्डो, इस्फहान आणि नंताज अणू उर्जा प्रकल्पांवर बंकर बस्टर बॉम्बने अमेरिकेने हल्ला केला होता. तेहरानमधील डोंगरांमध्ये जमिनीच्या १०० मीटर आत असलेल्या फोर्डो अणू उर्जा प्रकल्पावर बी २ बॉम्बरने हल्ला केला होता. हे बॉम्ब जमिनीच्या आता ६० ते ७० मीटरपर्यंत जातात. आता भारतही बंकर बस्टर बॉम्ब विकसित करणार आहे. डीआरडीओ बंकर बस्टर बॉम्ब बनवण्याच्या तयारीला लागला आहे.
भारताने भविष्यातील युद्धाची परिस्थिती पाहून नवीन क्षेपणास्त्र प्रणाली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली जमिनीच्या खाली बांधलेल्या शत्रूच्या अणुप्रकल्पांना नष्ट करण्यास सक्षम असणार आहे. त्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अग्नी V इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती तयार करत आहे. त्याचे मूळ व्हर्जन ५००० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रही वाहून नेतो. अग्नी क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती ७,५०० किलो वजनाचे मोठे बंकर बस्टर वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम असणार आहे.
काँक्रीटने बांधलेल्या शत्रूच्या लष्करी आणि धोरणात्मक लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी हे क्षेपणास्त्र डिझाइन केलेले आहे. हे क्षेपणास्त्र स्फोट करण्यापूर्वी जमिनीत ८० ते १०० मीटरपर्यंत ड्रिल करणार आहे. अमेरिकेप्रमाणे लष्करी क्षमता गाठण्यासाठी भारत या क्षेपणास्त्राची निर्मिती करत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करताना जगातील सर्वात मोठ्या बंकर बस्टर बॉम्ब GBU-57/A चा वापर केला होता. इराणच्या अणू उर्जा प्रकल्पांवर 14 GBU-57/A बॉम्ब टाकले होते.
भारताने विकसित केलेल्या GBU-57/A च्या स्वदेशी आवृत्तीचा उद्देश अधिक प्रभावी मारा करणे आहे. अमेरिकेचे GBU-57/A बॉम्ब टाकण्यासाठी महागड्या बॉम्बर्स विमानांची गरज असते. भारत मात्र आपले बंकर बस्टर बॉम्ब क्षेपणास्त्राच्या माध्यमातून टाकणार आहे. त्यामुळे भारताच्या बंकर बस्टर बॉम्बला कमी खर्च येणार आहे. यामुळे जागतिक शस्त्रांच्या बाजारपेठेत भारताची मक्तेदारी वाढणार आहे. भारत अग्नी-V प्रकल्पाचे दोन नवीन व्हर्जन डेव्हलप करत आहे. जमिनीच्या वर असलेल्या टार्गेटसाठी एअरबर्स्ट वारहेड असणार आहे. तर दुसरा डीप-पेनिट्रेटिंग क्षेपणास्त्र जमिनीखालील टार्गेटला लक्ष्य करणार आहे.