
नवी दिल्ली : G20 परिषदेसाठी भारतात आलेले कॅनडाचे पंतप्रधान विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ३६ तासांपासून भारतात अडकले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अखेर आपल्या देशाला रवाना झाले आहेत. त्यांना घेण्यासाठी कॅनडाहून दुसरे विमान पाठवण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारने त्यांना एअर इंडिया वन विमानाची ऑफर केल्याची माहिती समोर आले आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या शिष्टमंडळाला कॅनडात परतण्यासाठी एअर इंडिया वन विमानाची ऑफर दिली होती. मात्र कॅनडाने भारत सरकारचा हा प्रस्ताव फेटाळला होता. भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना देऊ केलेले एअर इंडिया वन बोईंग 777 विमान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्यांसाठी वापरले जाते.
9 आणि 10 सप्टेंबर रोजी झालेल्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो भारतात आले होते. जी २० परिषद संपल्यानंतर ट्रुडो आणि त्यांचे शिष्टमंडळ परतण्याच्या तयारीत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव दुसरे विमान पंतप्रधान टुड्रो यांच्यासाठी मागवण्यात आले.
कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली की जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या शिष्टमंडळाला आणण्यासाठी बॅकअप विमान CFC002 कॅनडातून येत आहे. मात्र हे विमान लंडनला वळवण्यात आले. कारण या विमानातही काही समस्या आढळून आल्याची माहिती आहे. यानंतर जस्टिन ट्रुडो ज्या विमानाने भारतात आले होते ते विमान दुरुस्त करून ते मंगळवारी दुपारी एक वाजता आपल्या देशासाठी रवाना झाले. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, विमानातील तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त करण्यात आला असून विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे.