
Indian Railways: भारतीय रेल्वे देशभरात प्रत्येक भागात जाते. रेल्वेची देशभरात ८ हजार ८०० पेक्षा जास्त स्टेशन आहे. लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना आयआरसीटीसीकडून जेवण, नास्ता दिला जातो. परंतु रेल्वेतील व्यंजनांमध्ये विविध स्वाद मिळणार आहे. ज्या भागातून रेल्वे जाईल, त्या भागातील स्थानिक व्यंजने रेल्वेत मिळतील. यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली.
खासदार सुमती थमिझाची थंगापंडियनन यांनी वंदे भारत ट्रेनमध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. पेंट्री कर्मचारी हिंदीत बोलत असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे अवघड होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, देशभरातील रेल्वेत लवकरच स्थानिक व्यंजने मिळणार आहे. ज्या भागातून रेल्वे जाईल, त्या भागातील खाद्यपदार्थ रेल्वे प्रवाशांना दिले जातील.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दक्षिण रेल्वेने महत्वाचा प्रयोग सुरु केला आहे. दक्षिण भारतातून धावणाऱ्या जास्तीत जास्त रेल्वेत स्थानिक खाद्यपदार्थ दिले जातात. हा प्रयोग हळहळू देशभर राबवण्यात येणार आहे. रेल्वे ज्या भागातून जाईल, त्या भागातील प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पूर्वी, पाश्चिम, उत्तर, दक्षिण सर्व भागात त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेली व्यंजने मिळतील.
रेल मंत्री वैष्णव यांनी अपघात रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कवच प्रणालीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कारिडोरमध्ये जवळपास 3,000 किलोमीटर मार्गावर कवच लावण्याचे काम प्रगतीवर आहे. या मार्गावरील 2,066 किलोमीटर मार्गावर ट्रॅकसाइडचे काम पूर्ण झाले आहे. कवच प्रणाली बसवण्यासाठी रेल्वेने 1,950 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहे.
वैष्णव म्हणाले, 2024-25 या वर्षात 1112 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय 2025-26 या वर्षात चिलखत कामासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कामांच्या प्रगतीनुसार आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.