
बंगळुरू, 12 नोव्हेंबर 2025 : इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने (ISF) आज अर्थशास्त्र, अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान, मानव्यविद्या आणि सामाजिक विज्ञान, जीवन विज्ञान, गणितीय विज्ञान व भौतिक विज्ञान या सहा श्रेणींमध्ये इन्फोसिस प्राइज 2025 च्या विजेत्यांची घोषणा केली. इन्फोसिस पुरस्काराने 2009 मध्ये स्थापन झाल्यापासून अशा व्यक्तींच्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान केला आहे ज्यांचे संशोधन आणि त्यांच्या शिष्यवृत्ती भारतावर लक्षणीय परिणाम करतात. प्रत्येक श्रेणीतील पुरस्कारात सुवर्णपदक, प्रशस्तिपत्र आणि 100000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रक्कम समाविष्ट आहे.
इन्फोसिस प्राइज 2025 च्या विजेत्यांच्यांची घोषणा आयएसएफचे विश्वस्त श्री. के. दिनेश (अध्यक्ष, विश्वस्त मंडळ), श्री. नारायण मूर्ती, श्री. श्रीनाथ बटनी, श्री. क्रिस गोपालकृष्णन, डॉ. प्रतिमा मूर्ती आणि श्री. एस. डी. शिबुलाल यांनी केली. आयएसएफचे इतर विश्वस्त श्री. मोहनदास पै, श्री. नंदन नीलेकणी आणि श्री. सलील पारेख यांनी या वर्षीच्या विजेत्यांचे अभिनंदन केले.
अर्थशास्त्र
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक निखिल अग्रवाल यांना अर्थशास्त्रातील इन्फोसिस प्राइज 2025 जाहीर करण्यात आले आहे. शालेय निवड, वैद्यकीय निवास आणि मूत्रपिंडदान अशा गोष्टींच्या अनुभवजन्य अभ्यासासाठी पथदर्शी पद्धतीचा विकास आणि अंमलबजावणी तसेच बाजारपेठ डिझाइनमध्ये त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान
टोरंटो विद्यापीठातील गणितीय आणि संगणकीय विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक (सीएससी) सुशांत सचदेवा यांना अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानातील 2025 चे इन्फोसिस प्राइज जाहीर करण्यात आले आहे. सुशांत सचदेवा यांना गणितीय ऑप्टिमायझेशन आणि अल्गोरिथमिक सिद्धांतातील दीर्घकालीन खुल्या प्रश्नांचे निराकरण या विषयातील सखोल अभ्यासासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे
मान्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे या विषयातील इन्फोसिस प्राइज 2025 शिकागो विद्यापीठातील दक्षिण आशियाई भाषा आणि संस्कृती विभागातील सहयोगी प्राध्यापक अँड्र्यू ऑलेट यांना जाहीर करण्यात आला आहे. ते या पिढीतील प्राकृत भाषांचे जगातील आघाडीचे अभ्यासक आहेत. त्यांचे लँग्वेज ऑफ द स्नेक्स हे पुस्तक मागील दोन हजार वर्षांमध्ये संस्कृत आणि भारतीय स्थानिक भाषेच्या अनुषंगाने प्राकृतच्या सांस्कृतिक भूमिकेचे सखोल विश्लेषण आहे.
जीव विज्ञान
जीव विज्ञानातील इन्फोसिस प्राइज 2025 बंगळुरू येथील राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्रातील सहयोगी प्राध्यापक अंजना बद्रीनारायणन यांना जीनोम देखभाल आणि दुरुस्तीच्या यंत्रणा समजून घेण्यातील त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला आहे.
गणितीय विज्ञान
गणितीय विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार 2025 मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील गणित शाळेतील सहयोगी प्राध्यापक सब्यसाची मुखर्जी यांना त्यांच्या अदिवतीय आणि मूलभूत कार्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे कार्य गणिताच्या दोन भिन्न क्षेत्रांना जोडते – क्लेनियन गट कृतींची गतिशीलता आणि जटिल गतिशीलतेमध्ये होलोमॉर्फिक आणि अँटी-होलोमॉर्फिक नकाशांची पुनरावृत्ती.
भौतिक विज्ञान
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (कॅलटेक) केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक कार्तिश मंथिराम यांना भौतिक विज्ञानातील 2025 चा इन्फोसिस पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना आवश्यक रसायनांबाबत शाश्वत इलेक्ट्रोकेमिकल कार्यासाठी त्यांच्या अग्रगण्य कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे.