मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report
जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. लाठीचार्ज होऊनही विद्यार्थी मैदानात डटून उभे आहेत. मिळेल ते खाऊन, जागा मिळेल तिथे झोपून त्यांनी रात्र जागवली. देशभरातून स्विगी-झोमॅटो आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे त्यांना अन्न व मदतीचा पुरवठा होत आहे.

अक्षय मंकनी, प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. पावसापाण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं. गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोमवारी तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे विद्यार्थी मैदान सोडतील असं वाटत होतं. पण विद्यार्थ्यांनी मैदान सोडलं नाही. विद्यार्थी मैदानात दटून उभे राहिले. गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी मैदानात ठाण मांडून आहेत. मिळेल ते खात आहेत. जागा मिळेल तिथे झोपत आहेत. कालची रात्र तर विद्यार्थ्यांनी जागून काढली. जंतरमंतरवर रात्रीपासून पहाटेपर्यंत काय काय घडलं? त्याचाच हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट…
जेवणाचे स्टॉल
रात्री 12:30 वाजता जंतर-मंतर परिसरात आंदोलकांची संख्या मोठी होती. या आंदोलकांना देशभरातून अन्नाचा पुरवठा होत आहे. आंदोलनाच्या ठिकाणी जेवण वाटप करण्याचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत.
स्विगी झोमॅटो केस स्टडी
आंदोलकांसाठी देशातील कान्या कोपऱ्यातून जेवण जंतर मंतर वर पाठवलं जात आहे. ऑर्डर बुक करणाऱ्यांकडून नाव जाहीर केल जात नाही. ज्यांना भूक असेल त्यांना हे अन्न द्या, अशी माहिती ते ऑर्डर घेऊन येणाऱ्या स्विगी झोमॅटोच्या मुलांना सांगत आहेत. बंगळूरू येथील एका डॉक्टरने तीन ऑर्डर पाठवल्या होत्या, त्या घेऊन एक स्वीगी बॉय जंतर मंतर इथं आला होता. 20 तारखेपासून जास्तीत जास्त ऑर्डर या इथल्याच असल्याचं त्याने टीव्ही9 सोबत बोलताना सांगितलं. दिवसातील माझ्या 90 टक्के ऑर्डर इथे पोहोच कराव्या लागत आहेत. ऑर्डर बुक करणारे अनेक जण आपल नाव सांगत नाहीत. मात्र हे अन्न पोहोचतं करायला सांगत असल्याचं त्याने सागितलंय.
पहाटे 5 वाजताचं चित्र
दिल्ली सकाळचे 5 वाजले आहेत आणि जंतर-मंतरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलंक अजून ठाण मांडून बसले आहेत. अनेक विद्यार्थी आंदोलक हे सध्या विश्रांती घेत आहेत आणि झोपले आहेत. या भागात उकाडा असल्याने इतर विद्यार्थांकडून हवा मारण्यात येत आहेत.
स्वयंसेवी संस्था मैदानात
जंतर-मंतर परिसरातील या आंदोलनात अनेक स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलकांची मदत मिळत आहे. सध्या या परिसरात सचखंड फाउंडेशनकडून मदत करण्यात येत आहे.
चित्र काढून निषेध
जंतर-मंतरमध्ये काही आंदोलक चित्र काढून आंदोलन करत आहे. शब्दांच्या माध्यमातून आंदोलन न करता आपल्या कलेच्या माध्यमातून सरकारला आरसा दाखवण्याचं काम या आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
कपिल सूर्यवंशी केस स्टडी
जंतर मंतरवर अजूनही विद्यार्थी आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी देशभरातून येत आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूर इथून आलेला कपिल सूर्यवंशी हा त्यातलाच एक. रात्रीची ट्रेन पकडून जंतर मंतरवर पोहोचून आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची सेवा करणारा. देशभरातील लोकांनी पाठवलेल अन्न आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थी, नागरिकांपर्यंत वाटण्याचं काम तो करतोय. इथं जी सेवा करायला मिळेल ती करायची आहे, जोपर्यंत आंदोलन संपत नाही, तोपर्यंत इथेच थांबणार आहे, अशी भूमिका कपिलने मांडली. ज्यादिवशी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता, त्यावेळी मी नेपाळला गेलो होतो. मात्र इथली परिस्थिती पाहून लगेच तातडीने इथे पोहोचल्याच कपिलने सांगितलंय.
राहुल कोटेकर केस स्टडी
दिल्लीच्या जंतर मंतर इथं आंदोलनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर जेवण, नाश्ता, पाणी आणि चहा देशभरातील नागरिकांकडून पाठवला जातोय. पाठवलेलं अन्न एकत्र करून विद्यार्थांना दिल जातंय. जेवणासोबत मेडिकलच साहित्य देखील पाठवलं जातं आहे. आंदोलनासाठी आलेल्या नागपूरच्या काही विद्यार्थ्यांकडून या वाटपाची व्यवस्था केली जातेय. अन्न वाया जाऊ नये याची खबरदारी या सगळ्यांकडून घेतली जातेय. दिवसभर आंदोलनाच्या ठिकाणी नियोजन, रात्री मेट्रो स्टेशन वर मुक्काम अशी परिस्थिती राहुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आहे.
नागपूरची आजीही मैदानात
नागपूरवरुन एक आजी कुटुंबासह आंदोलनात सहभागी होण्यासाठी आली आहे. मुलांना आधार देण्यासाठी आमच्यासारख्या आईंनी पुढाकार घेतला पाहिजे. ही आमचीच मुले आहेत, असं ही आजी सांगत आहे. ज्योती बागडे असं या आजीचं नाव आहे.
विद्यार्थी उचलताहेत कचरा
जंतर-मंतर परिसरातील आंदोलनमध्ये देशभरातून मदतीचा हात पुढे होत आहे आणि सर्व जेवणाची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत आहे. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा देखील जमा होत आहे. हा कचरा या ठिकाणी एकत्र करण्याचं काम आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि तरुणांकडून होत आहे. जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे या परिसरात आंदोलक तरुण-तरुणींकडून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
महाराष्ट्रातून आंदोलक दिल्लीत
जंतर-मंतर या आंदोलनस्थळी महाराष्ट्रातून अनेक आंदोलक आंदोलनसाठी आलेले आहेत. हे सर्व तरूण आहेत. हे सर्व तरूण सांगली, कोल्हापूर आणि पुण्याहून आले आहेत.तसेच जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलनाच्या स्टेज समोर जखमी तरुणांवर उपचार होत आहे. डॉक्टर याकुब खान यांच्याकडून या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.