
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकराणीची बैठक नवी दिल्लीत सुरु आहे. या बैठकीत २०२३ मध्ये होणाऱ्या दहा राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. तसेच २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणुकीवर मंथन झाले. आता २०२३ व २०२४ मधील निवडणुकीचा भाजपचा नेता ठरला आहे. विद्यामान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखालीच या निवडणुका लढवण्यात येणार आहे. त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. लालकृष्ण आडवाणी व अमित शाहा यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे ते तिसरे व्यक्ती आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुदतवाढीला मंजुरी देण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ पुढील एक वर्षासाठी म्हणजेच जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. नड्डा यांना जून 2019 मध्ये कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते. यानंतर 20 जानेवारी 2020 रोजी त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले. नड्डा यांचा कार्यकाळ २० जानेवारीला संपत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नड्डा यांच्या मुदतवाढीसंदर्भात प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव भाजपच्या कार्यकारिणीने स्वीकारला.यामुळे जे.पी.नड्डा जून 2024 पर्यंत अध्यक्ष राहतील.
का दिली मुदतवाढ
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये १० राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी माजी अध्यक्ष अमित शहा यांनाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. जेपी नड्डा यांच्या नावावर एकमत झाले नसते तर भूपेंद्र यादव यांचे नाव शर्यतीत आघाडीवर आहे. त्याचबरोबर गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
ठरले तिसरे नेता
नड्डा यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. लालकृष्ण अडवाणी आणि अमित शाहा यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे ते तिसरे नेते ठरले आहेत. मात्र, राजनाथ सिंह हे दोनदा पक्षाचे अध्यक्षही झाले, पण त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता.
बोम्मई जाणार का?
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. यामुळे कर्नाटकात भाजप श्रेष्ठी मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बोम्मई यांच्या संदर्भात महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप श्रेष्ठींशी चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांची बैठक घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादासंदर्भात कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशानंतर बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य कायम ठेवले.