तुमचा बापही रोखू शकत नाही… थेट मंत्र्याच्या मुलीनेच दिलं मुख्यमंत्र्यांना आव्हान
तेलंगणात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि मंत्री कोंडा सुरेखा यांची कन्या कोंडा सुष्मिता यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी परकल मतदारसंघात विद्यमान आमदाराला पाठिंबा दिल्याने संतप्त सुष्मिताने थेट आव्हान दिले आहे. 'तुमचा बापही रोखू शकत नाही,' असे म्हणत तिने मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुष्मिताने गरज पडल्यास अपक्ष लढण्याची घोषणा करत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही केले आहेत.

तेलंगनाच्या रेवंत रेड्डी सरकारमधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. रेवंत रेड्डी यांनी परकल विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदाराला तिकीट दिल्यानंतर पार्टीतील धुसफूस वाढली आहे. रेवंत रेड्डी सरकारमधील मंत्री कोंडा सुरेखा यांची कन्या कोंडा सुष्मिता हिने थेट मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपाटले आहेत. सुष्मिता हिने या थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देताना त्यांच्या अधिकारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दोन वर्षाची वाट का पाहायची? मुख्यमंत्र्यांना आताच राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे. त्यांना सांगा राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा, असं सुष्मिता यांनी सांगतानाच तुम्ही या, तुमचा बाप येऊ द्या, तुमचे आजोबा येऊ द्या, परकलमधून मीच आमदार बनेल, असा दावाही सुष्मिता यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यांनी विद्यमान आमदार रेवूरी प्रकाश रेडी यांना पाठिंबा दिला. तसेच रेवूरी रेड्डी यांना विजयी करण्याचं आवाहनही केलं. कोंडा कुटुंबाला मुलगी सुष्मिता हिला परकल मतदारसंघातून उभं करायचं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी थेट विद्यमान आमदाराची तळी उचलल्याने सुष्मिताचा पारा चढला. तिने एका जाहीर कार्यक्रमातून थेट मुख्यमंत्र्यांचा बापच काढत आव्हान दिलं आहे. त्यामुळे तेलंगनाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तर अपक्ष म्हणून लढेल
सुष्मिताने मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहेत. तसेच गरज पडल्यास परकलमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. सुष्मिताने यावेळी घाईघाईत उमेदवार ठरवण्याच्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला आहे. पक्षात मागास जातीच्या नेत्यांना बाजूला केलं जात आहे, असा आरोप करतानाच तिने मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवरही गंभीर आरोप केला आहे.
जो डायपर शिवाय चालत नाही
सुष्मिताने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने तलवारीने केक कापला आणि एक राजकीय घोषणाही केली. मी परकलमधून निवडणूक लढवेन आणि आमदार बनेल. रेवंत… तुम्ही मला आव्हान दिलं तर मी तुमच्या सर्व भावांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करेन. आज मी फक्त तुमच्या छोट्या भावाच्या 200 कोटीच्या जमीन घोटाळ्यावर बोलले. जर तुम्ही मला उत्तर दिलं तर मी तुमचे सर्व घोटाळे उघड करेन, असा इशारा देतानाच जो व्यक्ती डायपर शिवाय चालू शकत नाही, अशा 80 वर्षाच्या व्यक्तीला तुम्ही तिकीट दिलं हे किती हस्यास्पद आहे, असा हल्लाच तिने चढवलं.
राहुल गांधी उत्तर द्या
यावेळी बीआरएस प्रवक्ते कृष्णक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून तेलंगनामध्ये काँग्रेस सरकार आणि पार्टीच्या आतील संघर्षाची माहिती मिळते. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठे घोटाळे केल्याचंही या निमित्ताने समोर आलं आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनी याबाबत तेलंगनाच्या जनतेला उत्तर दिलं पाहिजे, असं कृष्णक म्हणाले.