Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंनी आता महाबळेश्वरकडे वळवला मोर्चा, ऐन सुट्टयांच्या दिवसात नामांकित हॉटेल्सना दिला दणका
Tukaram Mundhe FDA : अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रातील मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मोठी कारवाई केली आहे.,

सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासन करत असलेल्या कारवाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक प्रसिद्ध हॉटेलवर धाड टाकल्यानंतर त्रूटी दिसताच परवाने रद्द करण्यात आले. आता अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मोठी कारवाई केली आहे. तीन नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून इतर पाच हॉटेल्सना नोटीसा देत त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईंचे सत्र अद्याप थांबलेले नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात केली असली, तरी अद्याप काही ठिकाणी त्रुटी आढळल्यास कारवाई सुरूच आहे. याच मालिकेत महाबळेश्वरमध्येही कारवाई करण्यात आली.
कोणत्या हॉटेलवर झाली कारवाई?
ऐन सुट्टीच्या काळात महाबळेश्वर येथे झालेल्या या कारवाईमुळे संबंधित हॉटेल्समध्ये बुकिंग असलेल्या पर्यटकांची मोठी कोंडी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील हॉटेल रामसुख, हॉटेल ब्राइट्लँड आणि हॉटेल एव्हरशाईन या तीन हॉटेल्समध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांचे अन्न विक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. सुट्टीच्या काळात ही कारवाई झाल्याने पर्यटकांना पर्यायी हॉटेल शोधण्याची वेळ आली आहे.
दुसरीकडे, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरोधात मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून विक्री करणारा आणि विकत घेणारा दोघेही जबाबदार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये काही अधिकारीही सामील असल्याचे आरोप असल्याचे सांगत, अशा अधिकाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांनी दिला.