Maharashtra News LIVE : सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; जात प्रमाणपत्राला आव्हान
Maharashtra News LIVE Updates : भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. एवंढच नाही तर देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा...

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता पर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ‘ऊर्जा, पूजा आणि शरीरशांती’च्या नावाखाली शोषण केल्याचे आरोप आहेत. भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. नगर-पुणे महामार्गावर चास घाटात दारूच्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. भरदिवसा आयशर ट्रक पलटी झाली आहे. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. गोंदिया येथे गॅस टंचाईवरून घाबरण्याचे कारण नाही. असं आवाहन राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी जनतेला केलं आहे. अशाच देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा…
LIVE NEWS & UPDATES
-
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम आहे. निवडणुका लवकर घ्या ही दूध संस्था प्रतिनिधीची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. 1200 संस्था अपात्रतेचा निर्णय बाकी असताना निवडणुका कशा घेऊन चालतील असं कोर्टाने म्हटलं आहे. आता 28 तारखेला पुढील सुनावणी पार पडणार आहे.
-
पनवेल : कामोठ्यात 17 वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला
कामोठे परिसरात मंगळवारी रात्री 17 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या कामोठे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे युवकाच्या मित्र परिवाराकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
-
-
ठाणे : कोपरी ब्रिजवर काम सुरू असताना क्रेन उलटली
ठाण्यातील कोपरी उड्डाण पुलावर काही वेळापूर्वी हायड्रॉलिक क्रेन कोसळण्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; जात प्रमाणपत्राला आव्हान
सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया महेश शिंदे यांच्या विरोधात तक्रारदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रिया शिंदे यांनी सादर केलेले ‘कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, त्या विरोधात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील दत्तात्रय घोडके यांनी या प्रकरणी तक्रारदारांच्या वतीने वकीलपत्र सादर केले आहे. जयदीप कुमार मगर आणि संतोष साळुंखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
-
चोरलेल्या गॅस सिलिंडरसह आरोपीला अटक
चोरलेल्या गॅस सिलिंडरसह आरोपीला अटक
मुंबईतील चारकोपच्या गॅस गोदामातून २७ एचपी गॅस सिलिंडर गेले होते चोरीला
अखेर या प्रकरणात पोलिसांना मोठं यश
या प्रकरणात एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक, त्याच्याकडून 12 गॅस सिलिंडर जप्त
-
येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई
येवला पंचायत समितीच्या माध्यमातून १३ गावे व ६ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा
१३ टँकरच्या २२ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरु
ममदापूरमध्ये विहिरीत टँकरने पाणी टाकून पाण्याचा पुरवठा
आठ दिवसातून एकदाच नळांना पाणी पुरवठा…
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची विहिरीवर गर्दी -
नवेगाव बांधमध्ये नौका विहाराचा शुभारंभ
नवेगाव बांधमध्ये नौका विहाराचा शुभारंभ
पर्यटनाला मिळणार चालना
खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते नवेगाव बांध येथे बोटिंगची सुरुवात
खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौका विहाराचा घेतला आनंद
झिप लाईन-घोडेस्वारीमुळे नवेगाव बांध पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार
-
डोंबिवलीमधील मानकोली पुलावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, व्हिडीओ व्हायरल
डोंबिवलीमधील मानकोली पुलाच्या रस्त्यावर तरुणांची धोकादायक स्टंटबाजी
डोळे बंद करून दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दोन तरुण एकाच मोटरसायकलवर जीवाशी खेळताना दिसले
मागे बसलेल्या तरुणाने चालकाचे डोळे हाताने बंद केले
‘राइट-लेफ्ट’ सांगत स्टंट करत वाहन चालवण्याचा प्रकार
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, नागरिकांकडून कारवाईची मागणी
-
ST प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक
बीडमध्ये बंजारा समाजाने पारंपारिक पद्धतीने विश्व बंजारा दिन साजरा करत आरक्षणासाठी मोठी घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज लढाई लढत आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये राज्यातला पहिला विराट मोर्चा झाला होता. त्यानंतर आज विश्व बंजारा दिनी बीडमध्ये राष्ट्रीय बंजारा महासंघ नावाने स्वतंत्र संघटना स्थापन करून आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे.
-
मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये भीषण दुर्घटना
शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे.
-
नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरात दोन गटात हाणामारी झाली आहे. राजकीय वैमनस्यातून राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात झालेल्या राड्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
-
एसटी महामंडळाच्या वतीने 10% हंगामी भाव वाढ
छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाच्या वतीने 15 एप्रिल पासून 10% हंगामी भाव वाढ करण्यात आली आहे. हंगामी दहा टक्के भाव वाढीच्या निर्णयावर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया. महिलांसाठी अर्ध टिकीट करता आणि इकडे भाव वाढ करतात एसटी बंदच करून टाका अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
-
मणिपूर- हिंसाचार उसळल्याच्या दुसऱ्या दिवशी इम्फाळमधील जनजीवन विस्कळीत
मणिपूरच्या काही भागांत हिंसाचार उसळल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी, इम्फाळ खोऱ्यातील जनजीवन विस्कळीतच राहिलं आहे. इम्फाळ शहर आणि आसपासच्या परिसरातील दुकानं आणि बाजारपेठा बंद आहेत. इम्फाळ पश्चिम जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 7 एप्रिल रोजी ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’च्या कलम 163 अन्वये जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सुरक्षा दलांना अतिदक्षतेचा इशारा (हाय अलर्ट) देण्यात आला आहे.
-
धाराशिवमध्ये सुवासिनी कार्यक्रमाच्या जेवणातून 24 महिलांना विषबाधा
धाराशिवमध्ये सुवासिनी कार्यक्रमाच्या जेवणातून 24 महिलांना विषबाधा झाली. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी इथं ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या महिलांवर तुळजापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुवासिनीच्या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर महिलांना मध्यरात्री उलटी आणि चक्करचा त्रास जाणवू लागला. 24 महिलांपैकी एका महिलेची प्रकृती जास्त बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
-
हिंगोलीत इयत्ता तिसरी ते सहावीचे संकलित मूल्यमापन चाचणीचे अंदाजे 12 हजार पेपर जळून खाक
हिंगोलीत इयत्ता तिसरी ते सहावीचे संकलित मूल्यमापन चाचणीचे अंदाजे 12 हजार पेपर जळून खाक झाले आहेत. मराठी, इंग्रजी, गणित या विषयांचे अंदाजे 12 हजार पेपर जळून खाक झाले आहेत. औंढा नागनाथ पंचायत समितीतील शिक्षण विभागातील ही घटना आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
-
संभाजीनगरच्या व्हिट्स हॉटेल आणि जागा लिलाव प्रकरणी अहवाल सादर
संभाजीनगरच्या व्हिट्स हॉटेल आणि जागा लिलाव प्रकरणी अहवाल सादर करण्यात आला आहे. उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीचा अहवाल सादर झाला आहे. शिरसाटांच्या मुलाने व्हिट्स हॉटेलच्या जागेसाठी बोली लावली होती.
-
उत्तर कोरियाने एक संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानवर डागलं
उत्तर कोरियाने एक संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानवर डागलं आहे. संशयित क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपानमध्ये आणीबाणीचा इशारा देण्यात आला आहे.
-
तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्यासाठी दिव्यांगाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन
तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगाचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सूरू आहे. तुकाराम मुंडे यांची बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयात विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरु आहे. दिव्यांग बांधव कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीवरून आक्रमक झाले आहेत.
-
शस्त्रसंधी म्हणजे फक्त स्वल्पविराम, संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली, पण ती दबाव तंत्राचा भाग होती. सुरुवातीला 5 दिवस नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीजफायर (शस्त्रसंधी) जाहीर करून युद्धाला तात्पुरता विराम देण्याचा प्रयत्न झाला.अमेरिकेला हवे असल्यास इराणने अट पाळली नाही असे सांगून पुन्हा आक्रमकता वाढवता येऊ शकते. सध्याची शस्त्रसंधी म्हणजे फक्त स्वल्पविराम, संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही, अशी प्रतिक्रिया सतीश ढगे यांनी दिली.
-
रॉकेल वाटप बंद
अमरावती जिल्ह्याला 3 लाख 65 हजार लिटर रॉकेलची मागणी आहे. मात्र अमरावती जिल्ह्याला केवळ 1 लाख 8 हजार लिटर मिळणार. अमरावती जिल्ह्याला अजूनही रॉकेलचा पुरवठा प्राप्त व्हायचा आहे त्यामुळे रॉकेल वाटप बंद झाले. महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राला रॉकेल मिळणार नाही. अनेक वर्षांपासून केरोसीन विक्री बंद असल्याने परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरण करायला टाकले.
-
अवैध झोपड्यांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई
मुंबई महानगरपालिकडून गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात लोकशाही अण्णा भाऊ साठे नगरजवळील डब्बा वाला कंपाउंडमध्ये उभारण्यात आलेल्या हजारो अवैध झोपड्यांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेचे पथक सकाळपासूनच घटनास्थळी दाखल होऊन अवैध झोपड्या हटवण्याचे काम करत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई अवैध बांधकाम हटवून परिसरातील विकास कामांना गती देण्यासाठी करण्यात येत आहे. या ठिकाणी जेसीबी मशीन व इतर आवश्यक साधनसामग्रीच्या सहाय्याने झोपड्या हटवण्याचे काम सुरू आहे.
-
एकनाथ शिंदे घेणार ऑनलाईन बैठक
नव नियुक्त संपर्क प्रमुख्यांची घेणार ऑनलाईन बैठक, कार्यकर्त्यांना देणार कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आली. कुठल्याही निवडणुका नसल्याने शिवसेना आत्ता मिशन विधानसभा २०२९ च्या तयारीला लागणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. ही बैठक दुपारी नंदनवन इथून ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्व संपर्क प्रमुखांना ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
शेतकरी आत्महत्या प्रकरणात मोठा निर्णय ; तालुका स्तरावर नियुक्ती होणार चौकशी समिती
राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांतील मदतीचा पेच सोडवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आत्महत्यांची चौकशी थेट तालुका स्तरावर होणार आहे. तालुका समितीकडून छाननी करून प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळून शेतकरी कुटुंबांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान जिल्हा समितीचीही फेररचना करण्यात आली असून तीन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रस्ताव रखडत असल्याने आता तालुका स्तरावरच सखोल चौकशी करून अधिक अचूक प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवले जाणार आहेत.
-
सुनावणीदरम्यान खरातने जोडले हात
अशोक खरात याला VC द्वारे सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. खरातने दोन्ही हात जोडून आपले नाव सांगितले. न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात द्यावे यासाठी SIT ने न्यायालयाकडे अर्ज केला. न्यायालयाने अर्ज मंजूर केला. उद्या तिसऱ्या गुन्ह्याबाबत सुनावणी होईल. तिसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडीसाठी SIT युक्तिवाद करणार
-
सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ
अमेरिका इस्रायलमध्ये सीज फायर घोषित होताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 4 हजार रूपयांनी तर चांदीचा दरात ही 11 हजार रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपयांवर. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपयांवर.
-
आकाश मोरे बारामतीची पोट निवडणूक लढवण्यावर ठाम, पण…
बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मात्र पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेचा महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला तर मी आज देखील उमेदवारी माघारी घेण्यास तयार असं सांगून आकाश मोरे यांनी सांगून निवडणूक लढवण्यास संदर्भात सस्पेन्स निर्माण केलाय.
-
अमरावतीचे पोलीस राजस्थानात का बनले वाळू मजूर?
अमरावती पोलिसांनी तीन कोटींचे ड्रग्स जप्त केल्याचे प्रकरण. अमरावती शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस राजस्थानात बनले नदीत वाळू मजूर आणि हॉटेल मध्ये सिनेस्टाईल तीन कोटींच्या ड्रग्जच्या सूत्रधारास अखेर अटक. मजूर बनून राजस्थान मधील नदीत दिला कडा पहारा. 50 किलोच्या ड्रग्जची अमरावती पोलिसांनी केली डमी डील. पोलिसांनी बदलल्या आपल्या वाहनाच्या नंबर प्लेट्स, महाराष्ट्रा ऐवजी राजस्थानच्या नंबर प्लेट. मुख्य आरोपीला एमडी ड्रग्जच्या खरेदीचे आमिष दाखवण्यात आले.
-
मला खात्री आहे काँग्रेस माघार घेईल – विखे पाटील
“खरं म्हणजे निवडणूक बिनविरोध करायला पाहिजे. काँग्रेसने माघार घ्यायला पाहिजे होती, तो त्यांचा दोष नाही. पक्ष नेतृत्व,पक्षाला ज्या पद्धतीने घरघर लागली आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी असं माझं आवाहन आहे. दुर्देवी परिस्थितीत अजित दादा यांचा अपघात झाला आहे, मला खात्री आहे काँग्रेस माघार घेईल” असं विखे पाटील बोलले.
-
लव्ह जिहाद, जमीन लँड जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा
लव्ह जिहाद, जमीन लँड जिहाद विरोधात सासवड ते कोंढवा हिंदू जन आक्रोश मोर्चा व रॅलीचे आयोजन. भाजप आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार संग्राम जगताप, माजी आमदार संजय जगताप मोर्चा मध्ये सहभागी होणार. शिवतीर्थ सासवड, भिवरी बापदेव घाट मार्गे खडीमशीन चौक कोंढवा असा मोर्चाचा मार्ग असणार. मोर्चाच्या पार्श्वभूमी मोर्चा मार्गावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.
-
सिंधुदुर्गात गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय संकटात, अनेक पदार्थांना कात्री
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता सिंधुदुर्गातील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने जिल्ह्यातील हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कणकवलीतील काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅस अभावी आपल्या रोजच्या मेनूतील अनेक पदार्थ बनवणे बंद केले आहे, तर काही ठिकाणी घरातूनच पदार्थ बनवून हॉटेलमध्ये विक्रीसाठी आणले जात आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा कधी सुरळीत होईल आणि हे संकट कधी टळेल, याकडे आता सर्व हॉटेल धारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
-
जळगावात वाढत्या उन्हाचा केळीला तडाखा, रोपांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची नवी युक्ती
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा 40°C पार गेल्याने याचा मोठा फटका केळीच्या बागांना बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे केळीची पाने पिवळी पडून सुकू लागल्याने रोपांचे नुकसान टाळण्यासाठी नशिराबाद परिसरातील शेतकरी सरसावले आहेत. कडाक्याच्या उन्हापासून केळीच्या कोवळ्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांना पांढऱ्या कापडी पिशव्यांचे संरक्षक कवच घातले आहे. प्रखर सूर्यकिरणांपासून रोपांचा बचाव व्हावा आणि बागेतील ओलावा टिकून राहावा, यासाठी सुरू असलेली शेतकऱ्यांची ही धडपड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
चंद्रपुरात गॅस टंचाईची भीती; एजन्सीसमोर रांगाच रांगा
इराण-इराक आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने चंद्रपूर शहरात नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी काही ठिकाणी चक्क खाजगी बाऊन्सर्स तैनात करण्याची वेळ आली आहे. घरपोच गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असूनही, नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीवर गर्दी करत आहेत. या गोंधळामुळे नागरिक आणि एजन्सी मालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
-
जालन्यातील शाळा बनली धोकादायक, चिमुरड्यांना मंदिरात बसून धडे गिरवण्याची वेळ
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नागठाणा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून चक्क मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या दोन वर्गखोल्या पूर्णपणे मोडकळीस आल्या असून त्या कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना मंदिरात स्थलांतरित केले आहे. वारंवार तक्रारी करून आणि शाळा प्रशासनाने शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण?” असा सवाल आता ग्रामस्थ विचारत असून, प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहे.
-
ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला इराणने धडा शिकवला- संजय राऊत
इराण-अमेरिका या युद्धविरामाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळायला हवं होतं. ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला इराणने धडा शिकवला. देशासाठी कसं लढावं, हे इराणने दाखवून दिलं, असे संजय राऊत म्हणाले.
-
अमेरिकेबाबत जगाला असलेली भीती इराणने मोडून काढली- संजय राऊत
इराणसारखा देश अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले. तरीही इराण अमेरिका-इस्त्रायलला शरण गेला नाही. अमेरिकेबाबत जगाला असलेली भीती इराणने मोडून काढली, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले
-
जळगाव : अमेरिका-इराण मध्ये सीझफायर घोषित होताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगाव : अमेरिका – इराण मध्ये सीझफायर घोषित होताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 3 हजार रूपयांनी तर चांदीचा दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपये इतके आहेत.
-
चंद्रपूर :- गॅस टंचाईचा भास, चंद्रपुरात रांगांचा गोंधळ, बाऊन्सर तैनान
इराण-इराक-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना चंद्रपूर शहरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच लांबलचक रांगा लागत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी खासगी बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत. घरपोच गॅस पुरवठा सुरू असतानाही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसत आहे.
-
बीड – सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याच्या उल्लेखाचे निनावी पत्र व्हायरल.
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदू खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याच्या उल्लेखाचे एक निनावी पत्र सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळासह सर्वत्र या संदर्भात उलट सुलट चर्चा होत आहेत.
-
चंद्रपूर : मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
चंद्रपूर :- मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. अल्पेश दहागावकर असं 25 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.
अल्पेश लग्नाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचतांना अचानक खाली कोसळला. सुरुवातीला कोणालाही हे लक्षात आलं नाही, मात्र काही वेळातच तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याला गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं.
-
सोलापुरातील अवंती नगरमध्ये दुचाकीवरून येत चेन स्नॅचिंगचा प्रकार
वॉकिंग करत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबवले. विजयालक्ष्मी सावळे असे यां पिडीत महिलेचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांच्या 15 टीम चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाल्यात.
-
भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार
भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे. पुढील गुन्ह्यात पुन्हा ताबा मागण्याची शक्यता आहे. SIT ने कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तपासातील महत्त्वाचे खुलासे केले. सुरक्षा कारणास्तव मागील सुनावणी ऑनलाईन झाली होती. आजही ऑनलाईन सुनावणी होण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. खरात प्रकरणाकडे राज्यभराचं लक्ष लागलं आहे.
-
वाकड – म्हातोबानगर परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम
चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या वाकड-म्हातोबानगर येथील २४ मीटर डिपी रस्त्यावरील १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या तसेच बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. महापालिका स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
-
पिंपरी चिंचवड : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना दणका; ५४३५ नागरिकांकडून सव्वा कोटी दंड वसूल
पिंपरी-चिंचवड शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात ५ हजार ४३५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक कोटी १५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर शहर कचराकुंडीमुक्त करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या वतीने सुरू आहेत. शहरातील सर्व ठिकाणच्या कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याबाबत एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, स्वयंसेवक नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.
-
कल्याण रेल्वे स्कायवॉक बनला फेरीवाल्यांचा अड्डा; प्रवाशांना चालायलाही जागा नाही
कल्याण रेल्वे स्कायवॉक बनला फेरीवाल्यांचा अड्डा; प्रवाशांना चालायलाही जागा नाही… गर्दीत चेंगराचेंगरीची भीती वाढली; सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे आणि KDMC चे दुर्लक्ष उघड; संतप्त प्रवाशांची तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
-
पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! पवना धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
कडक उन्हाळा आणि वाढत्या मागणीमुळे पिंपरी- चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, धरणात आता केवळ ४६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून अखेरपर्यंत म्हणजेच पावसाळ्याच्या आगमनापर्यंत शहराला पुरेल इतकाच असल्याने, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. पिंपरी चिंचवड शहराला मुख्यत्वे मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज रावेत येथील बंधाऱ्यातून ५२० एमएलडी पाणी उचलते. याव्यतिरिक्त: एमआयडीसी: शहराच्या काही भागांसाठी ३० एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
-
गोरेगाव पूर्वेकडील रहेजा हाइट्स येथे दिसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा
मुंबईतील गोरेगाव पूर्व, दिंडोशी येथील रहेजा हाइट्समध्ये बिबट्या वारंवार दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल रात्रीसुद्धा एक बिबट्या या हाईप्रोफाइल सोसाइटीच्या पार्किंग लॉटमध्ये शिरला आणि तिथे उभ्या असलेल्या एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, लोक आपल्या मुलांना सोसायटीमध्ये खाली एकटे सोडत नाहीत. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी टीव्ही9 च्या माध्यमातून सरकारी प्रशासनाकडे बिबट्याला पकडण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा एक पिंजरा लावला.