राहुल गांधींचं व्हिजन, सोनिया गांधींची ब्लूप्रिंट; खर्गेंचं मिशन ठरलं…

एका सामान्य कामगार, मजुराच्या मुलाची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून गौरव केल्याबद्दल पक्षातील सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले.

राहुल गांधींचं व्हिजन, सोनिया गांधींची ब्लूप्रिंट; खर्गेंचं मिशन ठरलं...
| Updated on: Oct 26, 2022 | 4:27 PM

नवी दिल्लीः मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षपदाचा (Congress President) पदभार काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात स्वीकारला. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खर्गे यांची अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यात आला. पक्षाध्यक्ष या नात्याने बोलताना मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोनिया गांधींची (Sonia Gandhi) ब्ल्यू प्रिंट (Blue Print) पुढे घेऊन जाणार आणि आणि राहुल गांधींच्या व्हिजन पूर्ण करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याबरोबरच भाजपला तगडे आव्हान उभं करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

काँग्रेसमध्ये आता मल्लिकार्जुन खर्गे युग सुरू झाले आहे. बुधवारी त्यांना त्यांच्या नियुक्तीचं पत्रंही देण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष म्हणून खर्गे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सोनिया आणि राहुल गांधी यांचे कौतूक करत त्यांच्या विचारांची आपल्याला साथ पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यूपीए सरकारांवर सोनियांची छाप असो वा राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा. या दोन्ही गोष्टी काँग्रेससाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे या दोघांनीही आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ पक्षाला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे भावनिक होत त्यांना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्यासाठी भावनिक क्षण आहे.

एका सामान्य कामगार, मजुराच्या मुलाची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून गौरव केल्याबद्दल पक्षातील सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले.

1969 मध्ये त्यांनी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. त्या पदापासून ते या पदापर्यंतचा प्रवास त्यांनी भावनिक होत मांडला.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबू जगजीवन राम, सरदार पटेल आणि मौलाना आझाद यांच्यासारखे नेते असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे खर्गे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाविषयी, ध्येय धोरणांविषयी बोलताना ते म्हणाले की, याआधीही काँग्रेसने अनेक संकटं झेलली आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी सर्व नेत्यांनी पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने सामोरे जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अजेंड्यावर दलित मतदार आहेत. बोलताना त्यांनी सांगितले की, या देशाच्या संविधानाच्या निर्मितीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे आहे.

भाजपला बाबासाहेबांच्या राज्यघटनेऐवजी आरएसएसची राज्यघटना लागू करायची आहे, पण मात्र काँग्रेस तसे करु देणार नाही. काँग्रेसला आता संविधानाच्या रक्षणासाठी लढावे लागणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

काँग्रेसला शोषित, वंचित, मागास, गरीब आणि अल्पसंख्याकांचे नेतृत्व उभे करून त्यांच्यामध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे.

अशा प्रकारे काँग्रेसने आपला जुना राजकीय पाया पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत जोडो यात्रेच्या तीन दिवसांच्या दिवाळी सुट्टीत 48 दिवसांनी पहिल्यांदाच दिल्लीत आलेल्या राहुल गांधींनी खर्गे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

काँग्रेस अध्यक्ष असताना राहुल गांधी ज्या अजेंडा घेऊन चालत होते, तोच अजेंडा पुढे नेण्याचे संकेतही खर्गे यांनी यावेळी दिले.