Sanjay Raut : उद्धव ठाकरे शिवसेना 164 आणि मनसे फक्त 53 जागा, या प्रश्नावर संजय राऊतांकडे उत्तर काय?
Sanjay Raut : "महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रपतीला आणलं तरी आश्चर्य वाटणार नाही. परदेशात मोदींना मिठ्या मारणारे लोक आले तरी आश्चर्य वाटणार नाही. भाजपची ती परंपरा झाली आहे. 11 तारेखला मोदी मुंबईत येत आहेत. 13 तारखेला प्रचार संपतोय. एका खास धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे"

मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी झालीय. चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “हरि शास्त्री यांना मेरीटवर उमेदवारी दिली आहे. उमेदवारी देणाऱ्या आमच्या मंडळाने एकमताने उमेदवारी दिली आहे” “वायंगणकर आधीपण नगरसेवक होते. त्यांच्यावर अन्याय झाला कसं म्हणणार तुम्ही. तुम्ही इतरांना पण संधी मिळू द्या, ती सुरुवात स्वत:पासून करा” असं संजय राऊत म्हणाले. ‘प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक असतात. शाखाप्रमुख, विभागाप्रमुख त्यांचे पाठिराखे असतात’ असं राऊत म्हणाले.
9 ते 10 ठिकाणी बंडखोरी झालीय. त्यांना रोखणार कसं? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “ज्यांनी इतर पक्षांकडून उमेदवारी घेतलीय, त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. ते 5-10 कोटीसाठी गेले आहेत. शिवसेना-मनसेची युती भक्कम आहे” “मराठी माणूस बंडखोर म्हणवणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही. जर कोणी शिंदे गटात किंवा अन्य पक्षात गेलं असेल, तर ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या पाठित खंजीर खुपसण्यासारखं आहे. तुम्हाला दीर्घकाळ पद दिलेली आहेत. पक्षाला वाटलं बदल केला पाहिजे, तर तुम्ही पक्षासोबत असलं पाहिजे” असं राऊत म्हणाले.
आवळा-कोवळा ठरवणारे तुम्ही कोण?
मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना 164 आणि मनसे 53 जागांवर निवडणूक लढवत आहे. मनसेकडून आवळा देऊन कोवळा काढून घेतला अशी चर्चा आहे. त्यावर राऊत म्हणाले की, “राजकीय वर्तुळातील चर्चेला फार किमत द्यायची गरज नाही . राज ठाकरे काल मातोश्रीवर आले होते. कोवळा मिळाला म्हणून आले होते का? ते बाहेर हसत पडतानाचे फोटो तुम्ही काढलेत ना. आवळा-कोवळा ठरवणारे तुम्ही कोण?”
मनसेने 80 टक्के जागा जिंकाव्यात
“राजसाहेब यांच्या पक्षाच्या जागा जास्तीत जास्त जिंकून याव्यात अशी आमची भूमिका आहे. कारण त्यांच्या पक्षाने मनसेने उत्तम जागा जिंकल्या तर शिवसेनेने जिंकलेल्या जागांना किंमत आहे. तरच आम्ही बहुमताचा आकडा पार करु शकतो. राजसाहेबांना मिळालेल्या जागांपैकी 80 टक्के जागा त्यांनी जिंकाव्यात. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु” असं संजय राऊत म्हणाले. “काल राज ठाकरे मातोश्रीवर आलेले तेव्हा शिवतीर्थ, नाशिक, कल्याण-डोंबिवली येथे संयुक्त सभा कशा घ्यायच्या यावर चर्चा झाली. संयुक्त जाहीरनामा प्रकाशन या संदर्भात चर्चा झाल्या” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
