मला माफ करा! मार्क झुकरबर्ग झुकले, चूक स्वीकारली, पण मोदींची माफी न मागताच…काय घडलं?
काही विशिष्ट प्रेक्षकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या पेड प्रमोशनद्वारे अवैध आणि आक्षेपार्ह सामग्रीला चालना मिळाली, असेही मेटा कंपनीने कबूल केले आहे.

Face Meta Apology : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप या समाजमाध्यमांची मालकी असलेली मेटा कंपनी सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ फेसबुकवरून हटवल्याने एकच खळबळ उडाली. हा व्हिडीओ हटवल्यानंतर भारत सरकारकडून मेटा कंपनीला स्पष्टीकरण मागण्यात आले. तसेच मेटाने माफी मागावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना मेटा कंपनीने भारताची माफी मागितली आहेत. परंतु मेटाने ही माफी मोदींचा व्हिडीओ हटवल्यामुळे नव्हे तर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडीओ आणि डिपफेक कन्टेंटविषयी मागितली आहे.
मेटाने माफी नेमकी का मागितली?
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांनी भारत सरकारकडे अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित (CSAM) सामग्री, डीपफेक व्हिडिओ आणि अलीकडील तांत्रिक त्रुटींमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत मेटाने जबाबदारी स्वीकारली असून याच प्रकरणात माफी मागितली आहे.
अवैध आणि आक्षेपार्ह सामग्रीला चालना मिळाली
काही विशिष्ट प्रेक्षकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या पेड प्रमोशनद्वारे अवैध आणि आक्षेपार्ह सामग्रीला चालना मिळाली, असेही मेटा कंपनीने कबूल केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मेटाकडे स्पष्टीकरण मागितले होते.
बाल लैंगिक शोषणाशी संबंधित…
हे प्रकरण उजेडात येण्याआधी BBC Eye च्या तपासणी केली होती. या तपासणीत मेटाच्या प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित जाहिराती आढळल्याचा दावा करण्यात आला होता. या अहवालानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) मेटाला समन्स बजावत कठोर भूमिका घेतली होती.
ग्लोबल अफेअर्स प्रमुख दिल्लीत दाखल
याच प्रकरणावर आपली भूमिका मांडण्यासाठी मेटाचे ग्लोबल अफेअर्स प्रमुख जोएल कॅप्लन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दिल्लीत दाखल आहे. त्यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत प्लॅटफॉर्म सुरक्षा, कंटेंट मॉडरेशन आणि अलीकडील घटनांवर सविस्तर चर्चा केली. त्याआधी त्यांनी MeitY चे सचिव एस. कृष्णन यांच्यासोबतही बैठक घेत कंपनीची भूमिका स्पष्ट केली.
अलीकडील काळात भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बेकायदेशीर कन्टेंट, बाल सुरक्षेशी संबंधित मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार होणाऱ्या डीपफेक व्हिडिओंवर कठोर भूमिका घेतली आहे.