PM Narendra Modi : पीएम मोदी बिछान्यावर गेल्यानंतर किती सेकंदात झोपून जातात? ऐका त्यांचं उत्तर
PM Narendra Modi : खासदार अशोक मित्तल यांनी यावेळी पीएम मोदींना विचारलं की, तुम्ही इतक्या लोकांना दिवसभरात भेटता मग वेळ कशी संभाळता. त्यावर पीएम मोदी म्हणाले की, 'मी वर्तमानात जगतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची भेट घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनही उपस्थित होते. आम आदमी पार्टी, बीजेडी आणि टीएमसी या पक्षातून आलेल्या खासदारांनीही पीएम मोदींची भेट घेतली. पीएम मोदींनी खासदारांना जास्तीत जास्त वेळ सभागृहात घालवण्याचं आवाहन केलं. पीएम मोदींनी सर्व खासदारांना मिळून-मिसळून काम करण्याचा सल्ला दिला. “दुसऱ्या खासदारांची भाषण नीट, व्यवस्थित ऐका. त्यातून बरचं काही शिकायला मिळेल. सर्वांसोबत मिळून-मिसळून काम करा” असा सल्ला नरेंद्र मोदींनी दिला. त्यांनी खासदारांना सभागृहात 100 टक्के उपस्थित राहण्याचं सुद्धा आवाहन केलं. खासदार सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षांचा त्यांच्याकडून शिका असं मोदी म्हणाले.
आपल्या दैनंदिन रुटीनबद्दलही त्यांनी काही गोष्टी खासदारांशी शेअर केल्या. “बिछान्यावर पडल्यानंतर अवघ्या 8 सेकंदात मी झोपून जातो. मी दिवसातले फक्त तीन तास झोप घेतो” असं मोदींनी सांगितलं. Gen Z च्या मुद्यावर पीएम मोदी म्हणाले की, ‘आधी तुम्ही त्यांचं ऐका, मग ते तुमचं ऐकतील’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांशी जवळपास एक तास संवाद साधला. लेटर पॅडचा दुरुपयोग न करण्याचा त्यांनी खासदारांना सूचना दिल्या. “फोनवरुन काही चुकीचं बोलू नका. विरोधी पक्षांवर आपले मुद्दे लादू नका” असही त्यांनी खासदारांना सांगितलं.
मोदींना प्रश्न, तुम्ही वेळ कशी संभाळता?
खासदार अशोक मित्तल यांनी यावेळी पीएम मोदींना विचारलं की, तुम्ही इतक्या लोकांना दिवसभरात भेटता मग वेळ कशी संभाळता. त्यावर पीएम मोदी म्हणाले की, ‘मी वर्तमानात जगतो. मी आता तुमच्यासोबत आहे, तर मी कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा विचार करत नाही’ “मी ज्या क्षणात आहे, त्याचाच विचार करतो असं पीएम मोदी म्हणाले. विमान प्रवासात अनेकांना जेटलॅगचा प्रॉब्लेम होतो, त्या समस्येचा कसा सामना करता? या प्रश्नावर मोदी म्हणाले की, “प्लेनमध्ये बसल्यानंतर मी ज्या देशात जातो, त्याचवेळेनुसार सर्व सेट करतो. त्यामुळे अडचण येत नाही”