मतदान म्हणजे पागलपणा, 80 वर्षांच्या आयुष्यात कधीच…माजी न्यायाधिशांचं मोठं वक्तव्य!
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपण आयुष्यात कधीही मतदान केले नसल्याचा दावा करत त्यांनी भारतासाठी आधुनिक विचारसरणीच्या हुकूमशहाची गरज असल्याचे मत मांडले. त्यांच्या या विधानांमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रणालीवर जोरदार हल्ला चढवला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते निवडणूक राजकारण आणि मतदान प्रक्रियेला पूर्णपणे निरर्थक मानतात एवढंच नाही तर त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही मतदान केलेले नाही. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले काटजू?
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही मतदान केले नाही आणि कधी करणारही नाही. मी या वेडात कधीही सहभागी होणार नाही. मतदान केंद्रावर जाऊन मत देण्यात काहीच अर्थ नाही. गेल्या महिन्यातच मी ८० वर्षांचा झालो, अंस सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू त्यांच्या मुलाखतीत म्हणाले आहेत. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान न्यायमूर्ती काटजू यांनी निवडणूक प्रणाली, न्यायपालिका आणि देशात सुरू असलेल्या अलीकडील राजकीय घडामोडींवर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी माजी न्यायाधीश काटजू म्हणाले की, भारतासारख्या देशासाठी लोकशाही व्यवस्था व्यावहारिकदृष्ट्या अयशस्वी ठरली आहे. त्यांनी असाही आरोप केला की, देशातील ९० ते ९५ टक्के लोकसंख्या मतदान करताना उमेदवाराची क्षमता, प्रामाणिकपणा किंवा शिक्षण पाहत नाही, तर केवळ जात आणि धर्माच्या आधारावर मेंढ्या-बकऱ्यांप्रमाणे मतदान करते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्या समाजात लोकांची विचारसरणी आधुनिक आणि विवेकपूर्ण असते, तिथेच लोकशाही वैध ठरू शकते. जोपर्यंत देशातून जातीयवाद आणि सांप्रदायिकता समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत निवडणुकांना कोणताही अर्थ उरत नाही.
मतचोरीवर मांडलं मत
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आणि कथित ‘मतचोरी’च्या आरोपांविरोधात विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर न्यायमूर्ती काटजू यांनी टोला लगावलाय, काटजू म्हणाले की, लोक मतदानास पात्र नाहीत. जर मतदारांनी केवळ जातीच्या आधारावर मतदानाचे बटण दाबले, तर निवडणूक प्रणालीच्या सचोटीला काही अर्थ उरत नाही.
ते म्हणाले की, नितीश कुमार असोत, तेजस्वी यादव असोत किंवा इतर कोणताही नेता मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तरी, सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत जीवनात, गरिबीत, भुकेच्या प्रश्नावर आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.