इकडे विरोधक संसदेत गोंधळ घालत राहिले, तिकडे मोदींनी घेतले दोन मोठे निर्णय

Modi Cabinet Decisions : आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 32,701 कोटींच्या गुंतवणुकीच्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

इकडे विरोधक संसदेत गोंधळ घालत राहिले, तिकडे मोदींनी घेतले दोन मोठे निर्णय
PM Modi Cabinet News
Image Credit source: Google
| Updated on: Aug 07, 2026 | 6:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘एकूण 32,701 कोटींच्या गुंतवणुकीच्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 23,731 कोटींची गोबरधन योजना आणि आसाममध्ये बायहाटा चारियाली ते तेजपूरदरम्यान 8,970 कोटी खर्चून चार-लेन राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गोबरधन योजना

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, गोबरधन योजनेबाबत बोलताना म्हटले की, ही योजना सहा प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. यात उत्पादनाची हमीशीर खरेदी, स्थिर किंमत, भांडवली सहाय्य, पाइपलाइन पायाभूत सुविधांचा विकास, कर्ज हमी आणि नवकल्पनांसाठी चॅलेंज फंड यांचा समावेश आहे. प्रत्येक बायोगॅस प्रकल्पाला सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्क किंवा ट्रंक पाइपलाइनशी जोडले जाणार आहे. सरकारच्या पाठबळामुळे जागतिक इंधन दरांतील चढ-उतारांचा परिणाम कमी होईल. तसेच एमएसएमई आधारित प्रकल्पांना 85 टक्क्यांपर्यंत कर्ज हमी आणि प्रकल्पांसाठी भांडवली अनुदानही दिले जाणार आहे.

10 वर्षांत CBG उत्पादनात दहापट वाढीचे लक्ष्य

सरकारच्या अंदाजानुसार, पुढील दहा वर्षांत या योजनेमुळे कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) उत्पादनात दहापट वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन 40 हजार कोटींपेक्षा अधिक परकीय चलनाची बचत होईल. याशिवाय 75 हजार कोटींपेक्षा अधिक राष्ट्रीय जीडीपीमध्ये भर, 1.5 लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती, 10 दशलक्ष मेट्रिक टन जीवाश्म इंधनाला पर्याय, 40 दशलक्ष टनांपेक्षा अधिक कार्बन उत्सर्जनात घट आणि 250 दशलक्ष मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

आसाममध्ये 135.87 किमीचा चार-लेन महामार्ग

आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 वर बायहाटा चारियाली ते मिशन चारियाली या 135.87 किलोमीटर लांबीच्या चार-लेन महामार्गाला मंजुरी दिली आहे. 8,970 कोटी खर्चून हा प्रकल्प BOT (टोल) मॉडेलवर विकसित केला जाणार आहे. या महामार्गात आधुनिक मशीन-आधारित बांधकाम तंत्रज्ञान (AIMC), ओपन टोलिंग आणि प्रगत ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा असतील.

गुवाहाटी-तेजपूर प्रवासाचा वेळ कमी होणार

हा महामार्ग तेजपूरसारख्या महत्त्वाच्या संरक्षण केंद्राशी संपर्क अधिक मजबूत करेल, तसेच आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील दळणवळण सुधारेल. मालवाहतुकीला गती मिळेल आणि गुवाहाटी-तेजपूर प्रवासाचा कालावधी सुमारे साडेतीन तासांवरून केवळ 1.7 तासांपर्यंत कमी होईल. याशिवाय पाच बायपासच्या माध्यमातून वाहतूक कोंडी कमी होऊन प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us