
Mohan Bhagwat : मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी संघाची स्थापना, संघाचे उद्दिष्ट, हिंदू धर्म यावर भाष्य केले. याच कार्यक्रमात बोलताना संघाचे काम फारच अनोखे आहे.संपूर्ण जगात संघासारखे काम होत नाही. संघाला समाजाला फक्त संघटित करायचे आहे. या व्यतिरिक्त संघाचे दुसरे कोणतेही काम नाही, असे भागवत म्हणाले.
अनेक लोक म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे आहेत. परंतु मोदी यांचा एक पक्ष आहे. हा पक्ष संघापासून वेगळा आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले. संघाला दुसऱ्या संस्थांशी स्पर्धा करायची नाही. कोणाचाही विरोध न करता आम्ही आमचे काम करतो. संघाला लोकप्रियता नको आहे. संघाला सत्ता किंवा ताकदही नको आहे. देशाच्या भल्यासाठी जेवढी कामे होत आहेत ती सर्व कामे व्यवस्थित व्हावीत यासाठी संघ काम करतो. संघात व्यवहार होत नाही. आपुलकीच्या भावनेने संघात सगळे काम होते, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.
मोहन भागवत यांनी पुढे बोलताना हिंदू धर्मावरही भाष्य केले. भारताचा सनातन स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितलेले आहे की सगळे आपलेच आहेत. आपल्याला सगळ्यांना सोबत चालायचे आहे. आपल्याला कोणालाही मागे सोडायचे नाही. एकट्याला राहायचे असेल तर कोणत्याही नियमांची गरज नसते. जेव्हापासून सृष्टी आहे तेव्हापासून धर्म आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले.
तसेच, आपण विश्वगुरू होणार आहोत. भारतातील मुस्लीम आण ख्रिश्चन हे भारताचेच आहेत. भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिला हिंदू हा अभिमानाने आपण हिंदू असल्याचे सांगतो. दुसरा हिंदू हा मी हिंदू आहे तर मग त्यात काय झालं? यात अभिमानाची बाब काय आहे? असे म्हणतो. तिसरा हिंदू हा स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही मला घरात विचाराल तरच मी हिंदू असल्याचे सांगेन असं म्हणतो. चौथा हिंदू हा आपण हिंदू असल्याचेच विसरून गेला आहे. किंवा तो हिंदू असल्याचे त्याला विसरून जाण्यास भाग पाडण्यात आले आहे, असेही मत भागवत यांनी व्यक्त केले.