राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार विरोधक

काँग्रेस राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. ज्याला इंडिया आघाडीच्या इतर पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. राज्यसभेचे सभापती म्हणून जगदीप धनखड हे पक्षपात करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार विरोधक
| Updated on: Dec 09, 2024 | 5:16 PM

विरोधी पक्षाची इंडिया आघाडीकडून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याला इंडिया आघाडीच्या इतर पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून जगदीप धनखड हे पक्षपात करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. ते विरोधी पक्षांच्या खासदारांना संधी देत ​​नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप विरोधकांनी केलाय. ममता बॅनर्जी यांची टीएमसी, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष या प्रस्तावाला पाठिंबा देणार आहे.

राज्यघटनेच्या कलम ६७ (बी) अंतर्गत विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. आज देखील संसदेच्या दोन्ही सभागृहातील गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभेत अधूनमधून गदारोळ झाला आणि सभागृह अनेकवेळा ठप्प पडले. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. जगदीप धनखड यांनी विरोधी खासदारांच्या वृत्तीबद्दल दु:ख व्यक्त केले. ते कामकाजात अडथळा आणत आहेत आणि लोकशाहीच्या मंदिरात चर्चा टाळत आहेत. असं त्यांनी म्हटलं.

सोमवारी राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. एनडीएच्या खासदारांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर विदेशी संस्था आणि लोकांच्या माध्यमातून देशाचे सरकार आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.

काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी अदानी समूहाशी संबंधित मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तीन तासानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले. पण तेव्हाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. विरोधी पक्षातील काही सदस्य आपल्या जागेवरून पुढे आले. या गोंधळादरम्यान, अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी त्यांच्या चेंबरमध्ये बैठक घेतली.

मंगळवारी सकाळी 10:30 वाजता त्यांच्या चेंबरमध्ये पुन्हा भेट होणार आहे. यानंतर त्यांनी सर्व सदस्यांना संविधानाच्या शपथेचा काळजीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले जेणेकरून देशाची अखंडता प्राधान्याने राखता येईल.