LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025: ‘देवा’चंच वर्चस्व! महायुतीला सर्वाधिक जागा, इतरांच्या वाट्याला किती? आकडा समोर
Watch LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025 : नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर येत असून राज्यात देवाभाऊंचंच वर्चस्व पहायला मिळतंय. तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेटही चांगला आहे.

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आज नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची अपेक्षा केली जात असताना प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी शिवसेना (शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात लढत आणि संघर्ष उडल्याचं दिसून आलं. आता निकालादरम्यान मात्र राज्यभरात महायुतीचंच वर्चस्व पहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्या पक्षांसाठी संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं. याचा सकारात्मक परिणाम या निकालांमध्ये दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुती सर्वाधिक 216 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 49 जागांवर आघाडीवर आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये देवाभाऊंचंच वर्चस्व पहायला मिळतंय. तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेटसुद्धा तगडा आहे.
महायुती 216 (भाजप 118, शिवसेना 60, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 37 ) मविआ- 49 (काँग्रेस 33, शिवसेना (ठाकरे गट) 9, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 8) स्थानिक आघाडी – 23
गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर घेतल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 2 आणि 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आज (21 डिसेंबर) मतमोजणी होत असून सर्वाधिक जागांवर महायुतीच आघाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप 118, शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 37 जागांवर आघाडीवर आहे. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 33, शिवसेना (ठाकरे गट) 9 आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) 8 जागांवर आघाडीवर आहे.
जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकादेखील जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमध्ये कोणता पक्ष अधिक जागा जिंकतो, त्यावरून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीची गणितं ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
