
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरा बसला. या हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात २५ वर्षांनंतर प्रथमच मोठ्या संख्येने पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीरमधील एका संघटनेने घेतली आहे. यामागे पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता याप्रकरणी निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अनेक अर्थांनी युनिक आहे. कारण २५ वर्षांनंतर काश्मीरमध्ये अशाप्रकारे हल्ला झाला. यापूर्वी सुरक्षा दल आणि पोलिसांना लक्ष्य केले जात होते. मात्र आता ऐन पर्यटनाच्या काळात पर्यटकांना टार्गेट करणे हे धक्कादायक आहे. काश्मीरमधील पर्यटन हाच येथील लोकांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे.
जवळपास चार दहशतवादी रायफल घेऊन आले होते. ते पोलिसांच्या गणवेशात होते. पूर्वी हा गणवेश फक्त सुरक्षा दलांसाठी होता. मात्र आता पोलीस आणि इतर सुरक्षा संस्थाही तो वापरत आहे. त्या गणवेशामुळे कोणालाही ओळखणे कठीण झाले आहे. ओळखपत्र तपासले जात नाही तोपर्यंत ओळखही होत नाही. हे दहशतवादी कालच आलेले नसून ते १५ ते २० दिवसांपासून या परिसरात रेकी करत असावेत. त्यांनी कोणत्या हॉटेलमध्ये कोण थांबले आहे, याची माहिती मिळवली असावी. हॉटेल, टूर ऑर्गनायझर आणि गाईड यांच्याकडून त्यांनी ही माहिती घेतली असण्याची शक्यता आहे. या भागात अनेक पर्यटन स्थळे असल्याने, दहशतवाद्यांना माहिती मिळवण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा अवधी पुरेसा होता. ते शहर किंवा जंगलात लपून बसले असावेत, असा अंदाज आहे, असेही निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.
पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यांनंतर आता बदला घेण्याची वेळ आली आहे. तशी शक्यताही आहे. पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांनी आपले दौरे रद्द करून दिल्लीत येत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. याचा अर्थ काहीतरी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले.
दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारही या घटनेची गंभीर दखल घेत आहे. पुढील कारवाईबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.