मी तुमचा विद्यार्थी आहे, मला… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. 'मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?' असा प्रश्न विचारत त्यांनी अनेक सल्ले घेतले. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तसेच, शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांच्या आयुष्यात डोकावून त्यांचे बालपण जपण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही खास शिक्षकांशी खुमासदार संवाद साधला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी मोदींनी या शिक्षकांशी अनेक विषयांवर चर्चा करतानाच त्यांच्याकडून अनेक गोष्टींवर सल्ला मागितला. पंतप्रधानांनी सोशल मीडिया हँडलवर या खुमासदार गप्पांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांसोबत मुक्त संवाद साधला. मी काशीचा खासदार आहे. मी तिथे ब्रेस्ट कॅन्सरबाबतच्या जनजागृतीचं अभियान सुरू केलं आहे. आता महिला समोरून येऊन तपासणी करून घेत आहेत. याचं समाधान आहे. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. एका दिवसात सर्वाधिक लोकांच्या स्क्रीनिंगचा विश्व विक्रम करण्याची इच्छा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मला चांगला वक्ता व्हायचंय…
पंतप्रधानांनी यावेळी आपली पब्लिक स्पीकिंग स्किल्स अधिक चांगली करण्यासाठी सल्ले मागितले. जर मी तुमच्या इथे विद्यार्थी असतो आणि मला कुशल वक्ता बनायचं असेल तर तुम्ही मला काय सल्ला द्याल? मी काय केलं पाहिजे? असा सवाल पंतप्रधानांनी केला. त्यावर एका शिक्षिकेने उत्तर दिलं. सर्वात आधी तुमच्यात आत्मविश्वास असायला पाहिजे. अत्याधिक सराव आणि अभ्यासाने आत्मविश्वास येतो. तुमचं व्यक्तिमत्त्व पाहून मी स्वत: घाबरले होते, असं या शिक्षिकेने सांगितलं.
स्क्रीन टाइमवर काय म्हणाले?
स्क्रीन टाइम आता एक प्रकारची सवय झाली आहे. मुलांनी एक तर खेळांमध्ये अत्याधिक रस घ्यावा, खेळ म्हणजे व्हिडिओ गेम नाही. मैदानी खेळ. मला वाटतं विद्यार्थ्यांनी मैदानीत खेळात रस घेतल्यास स्क्रीन टाइमची त्यांची सवय सुटेल, असं मला वाटतं. आपण मुलांना जेवढं रचानत्मक कार्यात ठेवू तेवढा त्यांचा फायदा होईल. मैदानी खेळांमध्ये मुलांनी रस घ्यावा म्हणून आपल्याला असे काही प्रोग्राम तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यातून मुलांना प्रेरणा मिळेल, असंही मोदी म्हणाले.
बालपण मरता कामा नये
मी आता तुमच्याशी संवाद साधतोय. पण मला सर्व शिक्षकांना सांगायचं की, आपल्याला आता पुस्तकं आणि अभ्यासक्रमातून बाहेर पडून मुलांच्या आयुष्यात घुसलं पाहिजे. बालपण मरता कामा नये. बालपण कायम राखण्याचं सर्वात मोठं काम शिक्षकांचं आहे. विद्यार्थ्यांच्या आतील बालपण जागृत ठेवणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
