डिलिमिटेशननंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल? सुळेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार? राज्यातील अर्थ खातं…

डिलिमिटेशननंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.

डिलिमिटेशननंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल? सुळेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार? राज्यातील अर्थ खातं...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 9:16 AM

संसदेत पुढील आठवड्यात डिलिमिटेशन विधेयक सादर केलं जाणार आहे. संसदेत विधयेक मंजूर झाल्यानंतर मोदींच्या कॅबिनेटमध्येही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एनडीएला साथ दिल्यास सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद आणि महाराष्ट्र सरकारमध्येही इतरांना दोन मंत्रि‍पदे मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?

Loading...

एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीएत सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. पडद्यामागे सत्तेत वाटा मिळवण्यासाठी चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारने लोकसभेचं संसदेचं विशेष अधिवेशन हे 30 नोव्हेंबर रोजी आणि राज्यसभेचं 2 डिसेंबर रोजी आयोजित केलं आहे. सध्या सत्ताधारी आणि राष्ट्रवादीत सत्तावाटपाच्या चर्चा सुरू असल्याचे सांगितलं जात आहे. सभागृहात डिलिमिटेशन मंजूर होण्याआधी करार अंतिम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आलंय.

सुप्रिया सुळे केंद्रात जाणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra modi) कॅबिनेटमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची केंद्रीय मंत्रि‍पदी वर्णी लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आहेत. सुप्रिया सुळे यांनी कथित मतचोरीवरून इंडियाच्या आघाडीच्या मोर्चात सहभाग दर्शवला होता. परंतु मागील काही दिवसांपासून डिलिमिटेशनच्या मुद्यावरून स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाहीये. केंद्रासहित महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वातील सरकारमध्ये दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्य सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचाही समावेश आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास जयंत पाटील यांना अर्थखाते मिळण्याची शक्यता आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनाही एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.  दरम्यान, शरद पवारांच्या इतर दोघांना राज्यमंत्रिपदे मिळण्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु सुप्रिया सुळेंनी स्वत:च या चर्चा फेटाळून लावली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राज्यात फक्त 10 आमदार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us