
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक आयोग पद्धतशीरपणे लाखोंच्या संख्येने मतदारांची नावे मतदार यादीतून हटवत आहे. हा प्रकार व्होट चोरी नसून व्होट डिलीट करण्याचा कट आहे, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या देखरेखीखालीच हे गैरव्यवहार सुरू आहेत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाला.
हा हायड्रोजन बॉम्ब नाही, तो लवकरच येणार आहे. हा निवडणुकीतील गैरप्रकारांचा फक्त एक टप्पा आहे, ज्यामुळे देशातील तरुणांना निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी पाहता येतील. माझ्याकडे यासंदर्भात सबळ पुरावे आहेत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाहीत. मी माझ्या देशावर प्रेम करतो, संविधानावर प्रेम करतो आणि म्हणूनच मी लोकशाही प्रक्रियेचे रक्षण करत आहे असे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले. आलंदमध्ये ६,०१८ मते एका विशिष्ट हेतूमुळे काढून टाकण्यात आली. विशेषतः यामध्ये मोठ्या संख्येने दलित आणि ओबीसी मतदारांची नावे होती. एका बूथ-लेव्हल अधिकाऱ्याने मतदार यादीत पाहिले तेव्हा त्यात तिच्या काकांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे समजले. यानंतर तिने चौकशी केली असता, तिला सांगण्यात आले की शेजाऱ्याने हे नाव काढून टाकले आहे. तिने शेजाऱ्यांना विचारले असता, त्यांनी असे काहीही केलेले नाही, असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ, ज्या व्यक्तीचे नाव डिलिट करण्यात आले आहे आणि ज्याने ते नाव डिलिट केले त्या दोघांनाही याची कोणतीही कल्पना नव्हती. खरंतर एका बाहेरील शक्तीने यंत्रणा हायजॅक करुन ही मते काढून टाकली, असा दावा राहुल गांधींनी केला.
विशेष म्हणजे मतदार यादीतून नावं हटवण्याचा हा गैरप्रकार कोणत्याही स्थानिक कार्यकर्त्याकडून नव्हे, तर एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने सेंट्रलाइज्ड पद्धतीने केले जात आहे. हे काम व्यक्तींच्या माध्यमातून नाही, तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होत आहे. एक स्वयंचलित प्रोग्राम (ऑटोमेटेड प्रोग्राम) बूथवरील पहिल्या मतदाराचे नाव वापरून मतदार यादीतून नाव काढण्यासाठी अर्ज करत आहे. या प्रक्रियेत राज्याबाहेरील मोबाईल फोनचा वापर करण्यता आला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
“हे काम मोठ्या प्रमाणावर आणि संपूर्ण सिस्टीमच्या स्तरावर केले जात आहे, हे आम्हाला पूर्ण खात्रीने माहित आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त अशा लोकांचे संरक्षण करत आहेत, ज्यांनी भारतीय लोकशाहीला नष्ट केले आहे,” असा घणाघात राहुल गांधींनी केला.