स्टॅलिन म्हणजे ‘सावरकर 2.O’; विजय थलपती यांच्या पक्षाची खोचक टीका
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाने स्टॅलिनना 'सावरकर 2.0' म्हणत खोचक टीका केली. डीएमकेच्या भूमिकेतील बदलावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी, स्टॅलिन यांनी हे विधेयक तामिळनाडूच्या पुढील 25 वर्षांच्या हिताचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतच कोलित आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने स्टॅलिन यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. टीव्हीकेने स्टॅलिन यांचा एडिट केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला असून या फोटोत स्टॅलिन संघाच्या गणवेशात दिसत आहेत.
टीव्हीकेच्या आयटी विंगने हा फोटो ट्विट करून स्टॅलिन यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. स्टालिन, ऊर्फ सावरकर 2.0, अशी खोचक टीका टीव्हीकेने केली आहे. तसेच एका अॅनिमेटेड पोस्टमध्ये स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना आरएसएसचे सदस्य म्हणून शपथ घेताना दाखवलं आहे. तो क्षण ज्यावेळी ते पूर्णपणे संघी बनले, असा हल्लाच टीव्हीकेने चढवला आहे.
डीएमकेने भूमिका बदलली
डीएमकेने येत्या अधिवेशनात डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठा कल्लोळ माजला. डीएमकेचे उप महासचिव आणि खासदार ए. राजा यांनी, नव्या विधेयकात सर्वच राज्यांमधील एकसमान 50 टक्के जागा वाढण्याची तरतूद आहे, असं म्हटलंय. संसदेत डीएमकेचे 22 खासदार आहेत. राज्यसभेत 8 खासदार आहेत. या खासदारांची भूमिका हे विधेयक मंजूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे.
स्टॅलिन काय म्हणाले?
स्टॅलिन यांच्या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यावर स्टॅलिन यांनी आपली भूमिका मांडली आहे. तामिळनाडूच्या तीन वर्षाच्या दीर्घ संघर्षाचा हा विजय आहे. 2024मध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, त्या सर्व प्रमुख मागण्या या विधेयकात मंजूर करण्यात आल्या आहेत, असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
नव्या प्रस्तावात सध्याच्या लोकसंख्येच्या आधारे डीलिमिटेशन करण्यात आलेलं नाही. त्यालाच आमचा विरोध होता. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांचा फायदा झाला असता. संसदेतील प्रतिनिधीत्त्व ठरवण्यासाठी 1971च्या जनगणनेच्या प्रमाणाचा आधार म्हणून मानलं गेलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
25 वर्ष राज्याच्या हिताचं संरक्षण
संसदेत तामिळनाडूच्या भागिदारीची टक्केवारी कायम ठेवून लोकसभेच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. पुढच्या 25 वर्षापर्यंत राज्याचं राजकीय हित सुरक्षित राहणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, डीएमकेने यापूर्वी एप्रिलमध्ये आलेल्या डीलिमिटेशन बिलााल पूर्ण विरोध केला होता. हे विधेयक घाईगडबडीत आणणअयात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.