CJP ला खलिस्तानी गटाचा पाठिंबा? दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा व्हिडिओच समोर आला, भाजपची तिखट प्रतिक्रिया
Khalistan Support to CJP: खलिस्तानचा दहशतवादी गुरपतवंत सिंह याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. अर्थात सीजेपीकडून अजून त्याविषयीची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र भाजपने वेळेवर संधी साधली आहे.

Nishikant Dubey on CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीने एसआयआर मुद्याला हात घातला आणि गहजब उडाला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी तयार झालेल्या या दबाव गटाने ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागताच सत्ताधाऱ्यांना ते रूचले नाही. त्यात या पक्षाच्या विरोधात नवीन मुद्दा समोर येत आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याने सीजेपी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. वेळ प्रसंगी सीजेपीला फंडिंग करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला. त्यावर आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अर्थात अद्याप सीजेपीकडून याविषयावर अधिकृत टिप्पणी अथवा वक्तव्य करण्यात आलेले नाही.
भाजपला मिळाले आयते कोलीत
झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात खलिस्तानी गटाचा दहशतवादी पन्नू हा भारताविरोधात गरळ ओकताना दिसत आहे. तो सीजेपीला मदतनिधी देण्याची भाषा करताना दिसत आहे. शिख फॉर जस्टिस या संस्थेचा नेता गुरपतवंत सिंह पन्नू याने सध्याचे केंद्रातील सरकार उलथवण्यासाठी सीजेपीला पाठिंबा जाहीर केला आहे. वेळप्रसंगी फंडिंग करण्याचे आश्वासन दिले आहे. शिख तरुणांनी शिख होमलँड सिक्युरिटी फोर्सतंर्गत शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याचे वेडगळ आवाहनही त्याने केले. त्याचा हा व्हिडिओ शेअर करत दुबे यांनी सीजेपीवर निशाणा साधला आहे.
मोदींविषयी आपत्तीजनक कमेंट
खलिस्तान गटाचा दहशतवादी पन्नू याने पीएम मोदींविरोधात आपत्तीजनक टिप्पणी केली आहे. त्याने कॅनडाच्या दौऱ्यात पीएम मोदींना कायम विरोधाचा सामना करावा लागेल असे म्हटले आहे. या व्हिडिओत पन्नूचा भारत द्वेष एकदम उघड झाला आहे. त्याने भारताला आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्याची वल्गना केली तर भारताचा विनाश करण्याची पोकळ धमकी दिली आहे. त्याच्या या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. सध्या भाजपच्या गोटातून सीजेपीविरोधात अशा प्रकारच्या अनेक पोस्ट समोर येत आहेत. पण पन्नूच्या या व्हिडिओने वातावरण तापले आहे. निशिकांत दुबे यांनी सीजेपीला या व्हिडिओ आधारे कटघऱ्यात उभे केले आहे. पक्षाने अद्याप या विषयीची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.