
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलं. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथकाने तब्बल १७ वर्षांनी तहव्वूर राणाला भारतात आणले. तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी दिल्लीतील न्यायालयात तहव्वूर राणाबद्दल धक्कादायक खुलासा केला. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाने मुंबईप्रमाणे भारतातील इतर शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता, असा संशय राष्ट्रीय तपास संस्थेने व्यक्त केला आहे.
तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयात राष्ट्रीय तपास संस्थेकडून त्याची कोठडी मिळवण्यासाठी युक्तीवाद करण्यात आला. यावेळी एनआयएने न्यायालयात सांगितले की, तहव्वूर राणाची कसून चौकशी करणे आवश्यक आहे. १७ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची तपासणी करण्यासाठी त्याला विविध ठिकाणी घेऊन जाण्याची गरज आहे. हा कट त्याने कसा रचला? या कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी तहव्वूर राणाला NIA कोठडी मिळावी, हे आवश्यक आहे.
NIA तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाच्या कोठडीच्या मागणीचे हे एक मुख्य कारण होते. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या धर्तीवर भारतातील इतर शहरांमध्येही हल्ले करण्याचा कट होता का? याबद्दल एनआयएला जाणून घ्यायचे आहे. या हल्ल्यांसाठी ‘मुंबई मॉडेल’चा वापर करण्यात आला होता का, याचा तपास एनआयए करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2008 मध्ये तहव्वूर राणाने आग्रा, दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई या प्रमुख शहरांना भेटी दिल्या होत्या.
तसेच तहव्वूर राणाने मुंबईप्रमाणे भारतातील इतर शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता, असा संशय आम्हाला आहे, त्याचीही चौकशी करायची आहे, असेही राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितले. यानंतर कोर्टाने तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावली. मात्र यावेळी न्यायाधीशांनी राणासाठी काही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, त्याची दर २४ तासांनी वैद्यकीय तपासणी केली जाईल.
तसेच, त्याला दोन दिवसातून एकदा त्याच्या वकिलाला भेटण्याची परवानगी असेल. मात्र, वकील आणि राणा यांच्या भेटीदरम्यान एनआयएचे अधिकारी उपस्थित राहतील. त्या दोघांमध्ये विशिष्ट अंतर असेल. याशिवाय, तहव्वूर राणाला केवळ ‘सॉफ्ट-टिप’ पेन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.