आमदाराकडून जिल्हाधिकाऱ्याला सतत अश्लील मेसेज, थेट अटकेची कारवाई, प्रकरण बाहेर आल्यानं मोठी खळबळ!
सर्वात अगोदर आमदार सी. अरुल विग्नेश यांनी जिल्हाधिकारी पद्मजा यांना अश्लील मेसेज केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी पद्मजा यांनी पोलीस अधिक्षक शहनाज आई यांच्याकडे रितसर तक्रार केली.

TVK MLA Arrested : तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी टीव्हीके पक्ष आणि या पक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री थलापती विजय नेहमीच चर्चेत असतात. विजय यांनी आतापर्यंत अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. दरम्यान, हाच टीव्हीके पक्ष आता एका आमदारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीव्हीके पक्षाच्या एका आमदारावर चक्क जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील मेसेज केल्याच्या गंभीर आरोप करण्यात आलाय. या आरोपाअंतर्गत या आमदाराल थेट अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडालीय.
नेमकं काय घडलं? आरोप काय?
सी. अरुल विग्नेश असे अटक करण्यात आलेल्या आमदाराचे नाव आहे. या आमदाराने कल्लकुरिच्या जिल्हाधिकारी जे.ई. पद्मजा यांना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. 36 वर्षीय विग्नेश यांना शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली. जिल्हाधिकारी जे ई पद्मजा यांनी 23 नोव्हेंबर रोजी याबाबत रितसर तक्रार दिली होती. तक्रारीनंतर चार दिवसांनी अटकेची कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पद्मजा यांच्या यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल
सर्वात अगोदर आमदार सी. अरुल विग्नेश यांनी जिल्हाधिकारी पद्मजा यांना अश्लील मेसेज केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी पद्मजा यांनी पोलीस अधिक्षक शहनाज आई यांच्याकडे रितसर तक्रार केली. त्यानंतर एकूण पाच कलमाअंतर्गत सी. अरुल विग्नेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तामिळनाडू महिला छळवणूक प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या 75, 78, 79 आणि 132 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लैंगिक शोषण, पाठलाग करणे, विनयभंग, कर्तव्याचे पालन न करणे अशा वेगवेगळ्या कलमांचा आधार घेऊन आता या आमदाराला अटक करण्यात आलीय.
राजकारण तापलं
दरम्यान, या अटकेनंतर तामिळनाडूतील राजकारण तापले आहे. विरोधी बाकावरील डीएमके पक्षाचे खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी हे प्रकरण सर्वप्रथम बाहेर आणले होते. त्यानंतर थलापती यांचे सरकार हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. दुसरीकडे सरकारने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.