जनमताचा कौल महागठबंधनला होता, NDA निवडणूक आयोगामुळे जिंकली; तेजस्वी यादवांचा आरोप

मतमोजणी करताना रडीचा डाव खेळला गेला. त्यामुळे पोस्टल बॅलेटसची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली. | Tejashwi Yadav demands recounting of votes

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:36 PM, 12 Nov 2020
जनमताचा कौल महागठबंधनला होता, NDA निवडणूक आयोगामुळे जिंकली; तेजस्वी यादवांचा आरोप

पाटणा: बिहारच्या जनतेचा कौल महागठबंधनला (Mahagathbandhan) होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या कृपेमुळे एनडीए (NDA) जिंकली, असा खळबळजनक आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav ) यांनी केला. हा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. यापूर्वी 2015 साली जनमताचा कौल मिळाल्यामुळे महागठबंधनची सत्ता स्थापन झाली होती. मात्र, तेव्हाही भाजपने मागच्या दाराने सत्ता हस्तगत केली, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले. (RJD leader Tejashwi Yadav demanded recounting of postal ballot votes)

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. मात्र, निवडणूक आयोगाने महागठबंधनच्या पारड्यातील दान ‘एनडीए’च्या पारड्यात टाकले, असा दावा त्यांनी केला. मतमोजणी करताना रडीचा डाव खेळला गेला. त्यामुळे पोस्टल बॅलेटसची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली.


जवळपास 20 जागांवर राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांचा अत्यंत थोड्या फरकाने पराभव झाला आहे. तर अनेक मतदारसंघांमध्ये टपालाद्वारे आलेली मते अवैध ठरवण्यात आली. आम्हाला जनतेचा पाठिंबा होता. मात्र, ‘एनडीए’ने पैसा, छळ आणि ताकदीच्या जोरावर सत्ता हस्तगत केली. आमच्या अनेक उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातील पोस्टल बॅलेटस् अवैध का ठरवली, याचे कारण सांगण्यात आलेच नाही, असा दावाही तेजस्वी यादव यांनी केला.

‘बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार’, तेजस्वी यादव यांचं आमदारांना आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती केली आहे. बिहारमध्ये सत्ता महागठबंनचीच येणार, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी आज (12 नोव्हेंबर) महागठबंधनच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित केलं. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, खातेवाटपावरुन एनडीएतील घटकपक्षांमध्ये बिनसलं तर त्याचा लगेच फायदा घ्यायचा, अशी तेजस्वी यादव यांची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

‘जदयू’ची 15 वर्षातील सर्वात खराब कामगिरी; मुख्यमंत्रिपदावरुन नितीश कुमारांचे मन उडाले, भाजपकडून मनधरणी

(RJD leader Tejashwi Yadav demanded recounting of postal ballot votes)