
असे काही वृक्ष असतात, त्यांच्या विशिष्ट वासामुळे किंवा गुणधर्मामुळे साप त्यांच्या जवळ जात नाहीत, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. इतर ऋतूमध्ये साप बिळात राहातात, मात्र पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यानं साप बाहेर पडतात, आणि निवाऱ्यासाठी कोरडी जागा शोधत असताना घरात शिरतात. या काळात ग्रामीण भागांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. अशा वेळी काळजी घेणं हाच सर्वात प्रभावी उपाय आहे, पण सापांसाठी आपण इतरही काही उपाय करू शकतो.
सध्या छत्तीसगडच्या ग्रामीण भागामध्ये आढळणाऱ्या एका झाडाची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्याला स्थानिक लोक ‘सर्पनाशक वृक्ष’ नावाने ओळखतात. या वृक्षाबाबत येथील स्थानिक लोकं असा दावा करतात की, हे झाड ज्या ठिकाणी असेल तिथे साप चुकूनही फिरकत नाही. छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा वृक्ष आपल्या घराभोवती लावला जातो. त्याची योग्य ती काळजी घेतली जाते, हे झाड म्हणजे सापांपासून बचावाचं खूपच प्रभावी साधन असल्याचा दावा येथील स्थानिक करतात. या वृक्षाचं धार्मिक महत्त्व देखील आहे.
येथील एका ग्रामस्थाकडून असा दावा देखील करण्यात आला आहे की, हे झाडं त्याने जंगलातून आणून आपल्या घरात लावलं होतं. हे झाडं लावून अनेक वर्ष झाले, जेव्हापासून हे झाड लावलं आहे, तेव्हापासून कधीच घरात किंवा परिसरात साप दिसला नाही. अनेक जण या झाडाला आपल्या शेतात देखील लावतात. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या झाडाचा वास एवढा तीव्र आहे की, एकतर साप या झाडाच्या आसपास जातच नाही, आणि गेला तरी सापाचा मृत्यू होतो. त्यामुळे या गावातील लोक जंगलांमधून या वृक्षाचं रोप आणून आपल्या घरात लावत आहेत.
पवित्र वृक्ष
या झाडाचं छत्तीगडमध्ये धार्मिक महत्त्व देखील आहे. या झाडाला येथील लोक महादेवाचं स्वरूप मानतात. या लोकांची अशी मान्यता आहे की, हा वृक्ष महादेव भक्तांचं संरक्षण करतो. गावकरी दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर आपण ज्या प्रकारे तुळशीची पूजा करतो, तसंच इथे या झाडाची पूजा केली जाते. या गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, या झाडाची पूजा केल्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. घराचं संरक्षण होतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)