तिरंगा फडकवणं हा गुन्हा आहे का? अभिजीत दीपकेंचा दिल्ली पोलिसांना सवाल; केंद्र सरकारवरही गंभीर आरोप
Abhijeet Dipke News: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंनी हल्लाबोल केला आहे.

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी दिल्ली पोलिसांवर जंतर मंतरवर पोहोचून राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या पक्षाच्या तीन सदस्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या अटकेला अपहरण म्हटले आहे. तसेच त्यांना वकील भेटू दिले जात नसल्याचा आरोपही केला आहे. कडक बॅरिकेडिंग आणि मोठ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये जंतर मंतरवर पोहोचल्यानंतर सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेण्यात आले.
यानंतर अभिजीत दीपके यांनी सांगितले की, पक्षाचे आणखी एक सदस्य अजिंक्य शिंदे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस वकिलांना अटकेतील लोकांना भेटण्यापासून कसे रोखू शकतात? जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी. तिरंगा फडकवणे हे कायद्याचे उल्लंघन कधीपासून झाले? जंतर मंतरवर राष्ट्रध्वज फडकवणे हे उल्लंघन आहे असे ज्यांना वाटते, ते देशद्रोही आहेत. राष्ट्रध्वज बाळगल्याबद्दल तिघांना अटक झाली असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
अभिजीत दिपकेंनी या अटकेला त्यांनी हुकूमशाही मानसिकतेचे उदाहरण म्हटले. ते म्हणाले की, सीजेपीचे कायदेशीर पथक या अटकेविरोधात न्यायालयात दाद मागेल. जंतर मंतरवर निदर्शनांवर बंदी घातल्यास देशभरात आंदोलने सुरूच राहतील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर लोकशाही विरोधाला दडपण्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, जर त्यांना वाटत असेल की जंतर मंतरला आंदोलन स्थळ म्हणून घोषित न केल्यास आंदोलन थांबेल, तर संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल. जंतर मंतर हा प्रत्येक आंदोलकाचा आत्मा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या आंदोलनात सामील होण्यासाठी आपण बुधवारी दिल्लीला पोहोचणार. वाटेत पोलिसांनी आपल्याला थांबवल्यास किंवा ताब्यात घेतल्यास जिथे थांबवले जाईल तिथूनच आपण आंदोलन सुरू करू, असेही ते म्हणाले.
अभिजीत दिपके म्हणाले की, सरकार संभ्रम निर्माण करत आहे. सरकार फोडा आणि राज्य करा असं करायला बघत आहे. सरकार जे करत आहे त्यासाठी आम्हाला मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागणार आहे. उद्या आमची नॅशनल कमिटीची मिटींग असेल. तुम्हाला सांगायला काहीच कारणे नाहीत. दिल्लीमध्ये जितकेही लोक निदर्शने करत आहेत त्यांना ताब्यात घेत आहेत. ती एक प्रकारची किडनॅपिंग आहे.
त्यांनी सांगितलं की, ज्ञानेश कुमारसाठी यांनी दिल्ली ठप्प पाडली. लोकशाहीला वाचविण्यासाठी आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावे लागणार आहे. मला काय वाटतं ते महत्वाचे नाही. ज्ञानेश कुमार हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सुचनांवर काम करत आहे. यात त्यांची मानसिकता दिसून येत आहे. कोण जिंकणार आहे हे निवडणुकीपुर्वी अमित शाह कसे काय सांगू शकतात? सरकारला मला काही इशारा द्यायचा नाही आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतात इतकी विविधता आहे. एका विचारधारेवर हा देश चालू शकत नाही. हा देश संविधानानुसारच चालेल. इम्रान खान भारतीय नाही आहे तर जयशंकरचे मुले कुठे भारतीय आहे? ज्ञानेश कुमार नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या ऑर्डरवर काम करत आहेत. तसेच दिल्ली पोलीस किडनॅपिंगचे काम करत आहेत. तिरंगा ध्वज फडकवणे हा गुन्हा आहे का? भारत हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारेवर चालणारा देश आहे, असं म्हणत अभिजीत दिपकेंनी सरकार टीका केली आहे.
