मोठी बातमी! मंत्रिपद न मिळाल्याने 2 आमदारांचा राजीनामा, राजकारणात खळबळ
Karnataka Cabinet Expansion : कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यानंतर दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यानंतर पक्षातील नाराजी समोर आली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये विजयपूरा जिल्ह्यातील इंडी मतदारसंघाचे आमदार यशवंत रायगौडा व्ही पाटील आणि सागर मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपालकृष्णा यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अनेक आमदार नाराज
सोमवारी कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पडला. यावेळी 19 मंत्र्यांचा शपथनिधी पार पडला. या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम करूनही आणि वरिष्ठ असूनही मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची भावना अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून दोन्ही आमदारांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आता आगामी काळात हे दोन्ही नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे
आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पी. एम. नरेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के. एस. बसवनथप्पा, बी. नागेंद्र, टी. रघुमूर्ती, बी. झेड. जमीर अहमद खान, रिजवान अरशद, संतोष लाड, मधु बंगारप्पा, पुत्तरंगशेट्टी, मंकळा वैद्य, अजय सिंह, एन. चालुवराया स्वामी, के. एम. शिवलिंगे गौडा, एच. सी. बालकृष्ण, बसवराज रायरेड्डी, विजयानंद काशप्पनावर, लक्ष्मण सावदी या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकातील काँग्रेस हायकमांडने विधानसभा आणि विधानपरिषदेतील सभापतींच्या नावांचीही घोषणा केली आहे. जी. एस. पाटील हे विधानसभा अध्यक्ष असणार आहेत, तर ए. एस. पोनण्णा उपाध्यक्ष असतील. त्याचबरोबर सलीम अहमद विधानपरिषदेचे सभापती असणार आहेत. तर उमाश्री या उपसभापती असणार आहेत. डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील ही टीम आता कर्नाटकच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहे.