निवडणूक आयोगावर विरोधकांचे आरोप; ज्ञानेश कुमारांनी भूमिका स्पष्ट करावी, NDAतील मंत्र्याची पहिल्यांदाच प्रतिक्रिया
Chirag Paswan Election Commission Clarification : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आता मुख्य निवडणूर आयुक्त यांच्यासंदर्भातील वादामध्ये आता उडी घेतली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

सध्या देशामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात वातावरण चांगलच तापलं आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण त्यामध्ये भाजपाचा हस्तक्षेप असतो, असा गंभीर आरोप लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही केला आहे. पण काल त्यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा थेट राजीमानाच मागितला आहे. त्याशिवाय कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनीही मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यातच आता एनडीएकडून केंद्रात मंत्री असलेले लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी राजकीय वातावरण तापत असल्याने निवडणूक आयोगाने यासगळ्यावर स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले चिराग पासवान?
पटना येथे पत्रकारांशी संवाद साधताना चिराग यांनी सांगितलं की, “निवडणूक प्रक्रियेसंबंधी काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणे नेमकं काय आहे ते स्पष्ट करावे, खासकरुन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी यावर त्यांचं मत भक्कमपणे सर्वांसमोर मांडलं पाहिजे. त्यामुळे जनतेच्या मनातही काहीही संभ्रम तयार होणार नाहीत. ”
चिराग यांनी सांगितलं निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र स्वायत्त संस्था असताना त्यावर जर काही आक्षेप घेतले जात असतील तर त्यावर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारीही निवडणूक आयोगाचीच आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “विरोधी पक्षाला काय वाटतं यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे ते सामान्य जनतेला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या सगळ्या गदारोळामुळे जनतेच्या मनामध्ये निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारचा संभ्रम आणि अविश्वास निर्माण नको व्हायला.”
याचसोबत त्यांनी स्पष्ट केलं की, विरोधी पक्षाकडे राजकारणासाठी मुद्दा काय आहे? त्यामुळे ते असे आरोप करतातच. पण निवडणूक आयोगाने विरोधपक्षाला उत्तर देण्यासाठी नव्हे तर सामान्य जनतेला उत्तर देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशाच्या लोकशाहीची सुंदरता टिकून राहण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांचा विश्वास कायम राहणं हे अत्यंत गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.