
लखनऊ : महापालिका निवडणुकीत ( UP Municipal Election Result ) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम असल्याचं दिसलं आहे. कारण राज्यातील 17 महापालिकांच्या जागांवर कमळ उमललं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात यूपीमधील सर्व 17 महापालिका जागांवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांनी बाजी मारली आहे. सीएम योगींच्या कामाचा परिणाम म्हणजे गेल्या वेळी गमावलेल्या मेरठ आणि अलीगडच्या जागाही भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच स्थापन झालेल्या शाहजहानपूर महापालिकेत देखील भाजपने चमत्कार घडवलाय. येथेही भाजपच्या उमेदवार अर्चना वर्मा यांना प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला आहे.
17 पैकी 17 जागांवर कमळ
भाजपने यूपीतील सर्व 17 जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी कानपूर, बरेली आणि मुरादाबादमध्ये भाजपने मावळत्या महापौरांवर उतरवलं होतं. उर्वरित सर्व जागांवर नवीन कार्यकर्ते उभे केले होते. 17 पैकी 17 जागांवर सर्वसामान्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब करत कमळ फुलवले.
4 उमेदवारांना पुन्हा महापौर होण्याचा मान
पक्षाच्या चार उमेदवारांनी दुसऱ्यांदा महापौर होण्याचा मान मिळविला. कानपूरचे प्रमिला पांडे, मुरादाबादचे विनोद अग्रवाल आणि बरेलीचे उमेश गौतम दुसऱ्यांदा महापौर झाले, तर हरिकांत अहलुवालिया हे यापूर्वी मेरठचे महापौर राहिले आहेत. झाशीमध्ये भाजपचे बिहारी लाल पहिले विजयी झाले. त्यांना एकूण 123503 मते मिळाली. तेथे निवडणूक लढविलेल्या इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
योगींच्या 50 सभा
सीएम योगी आदित्यनाथ यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकूण 50 सभा घेतल्या. योगी आदित्यनाथ यांनी येथे 9 प्रभागांतर्गत 10 महापालिका क्षेत्रात सभा घेतल्या. योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या टप्प्यात एकूण 28 सभा घेतल्या.
4 मे रोजी पहिल्या टप्प्यातील 37 जिल्ह्यांमध्ये मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात सीएम योगींनी 22 रॅली घेतल्या. यामध्ये नऊ मंडळांच्या सात महापालिकांसाठी मतदान झाले. सीएम योगी अयोध्या महापालिकेसाठी दोनदा येथे पोहोचले. येथील संत संमेलनात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती विजयासाठी अत्यंत प्रभावी ठरली.