लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील जागांबाबत मोठा सस्पेन्स

| Updated on: Mar 02, 2024 | 7:22 PM

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवणडणूकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील जागांबाबत मोठा सस्पेन्स
Follow us on

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 राज्यांमधील 195 जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मात्र पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही त्यामुळे मोठा सस्पेन्स आता वाढला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 34 केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून कोणत्या उमेदावारांची नावे जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र पहिल्या यादीमध्ये 16 राज्यांची यादी जाहीर करण्यात आली असली तरी महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नाही.

पहिल्या यादीमध्ये 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 145 जागांचा निर्णय झाला आहे. नरेंद्र मोदी वाराणसी आणि अमित शाह हे गांधीनगर येथून निवडणूक लढवणार आहेत. 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावे या यादीत आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. 28 मातृशक्ती (महिला), 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार, अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आलं आहे, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.

पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराची भाजपने घोषणा केली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत असल्यामुळे जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे  पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराचं नाव दिसलं नाही. महाराष्ट्रात असलेल्या 48 जागांमध्ये भाजप किती जागांवर लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याधीच सांगितलं आहे की शिवसेनेचे उमेदवार हे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावरच लढणार आहेत.

दरम्यान, महायुतीमध्ये आता हालचाली वाढायला सुरूवात झाली आहे. काही जागांवरून महायुतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे. कारण तिथे कोणताही उमेदवार मागे हटायला तयार नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता महायुती यावर कशा प्रकारे तोडगा काढते याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

उत्तर प्रदेश 55, प. बंगाल 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 14 पैकी 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीर 2, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दिव-दमन 1, अशा 195 जागांची घोषणा भाजपने केली आहे.