Delimitation Bill Explainer: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात नेमकं काय? पहिली प्रत समोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन (सीमांकन) विधेयक आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. अशातच आता मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भातील डिलिमिटेशन विधेयकाची प्रत समोर आली आहे.

प्रमोद जगताप, प्रतिनिधी: केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सध्या सर्वात चर्चेत असलेले आणि जोरदार विरोध असलेले मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन बील सादर होेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन (सीमांकन) विधेयक आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. अशातच आता मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भातील डिलिमिटेशन विधेयकाची प्रत समोर आली आहे.
डिलिमिटेशन विधेयकात नेमकं काय? पहिली प्रत समोर
देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भातील डिलिमिटेशन विधेयकाची प्रत समोर आली आहे. या विधेयकात सध्याच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार लोकसभेच्या एकूण जागा ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार राज्यांसाठी लोकसभेच्या जागांची कमाल मर्यादा ५३० वरून ८१५ करण्यात येणार आहे.
तर केंद्रशासित प्रदेशांसाठी जागांची संख्या २० वरून ३५ करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय राज्य विधानसभांच्या सदस्यसंख्येतही वाढ करण्याची तरतूद असून, कमाल सदस्यसंख्या ५०० वरून ६५० पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के म्हणजेच एकतृतीयांश आरक्षण लागू करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर महिला आरक्षण लागू होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जागांचे वाटप आणि मतदारसंघांची रचना २०५१ पर्यंत कायम ठेवण्याची तरतूद या विधेयकात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रस्तावामुळे देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची रचना नव्याने होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा!
दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबर २०२६ पासून आणि राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबर २०२६ पासून सुरू होऊन दोन्ही सभागृहांची कार्यवाही ३ डिसेंबर २०२६ पर्यंत चालण्याची शक्यता आहे. एकीकडे काँग्रससह इंडिया आघाडीतील पक्षांचा या विधेकायला विरोध होत आहे. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र पाठिंबा दिला आहे.