
आनंद पांडे, Tv9 मराठी, अयोध्या | 29 डिसेंबर 2023 : अयोध्या नगरी रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झालीय. भव्य-दिव्य आणि ऐतिहासिक राममंदिरात येत्या २२ जानेवारीला मूर्तीची प्रतिष्ठापना होतेय. त्यानिमित्तानं भविष्यात अयोध्येत येणारी भरभराट म्हणजे सीतामातेनं दिलेला शाप परत घेतल्याचा दावा विमलेंद्र मिश्रांनी केलाय. आता अयोध्येला सीतामातेनं काय शाप दिला होता, ते समजून घेण्याआधी बिमलेंद्र मिश्रा कोण आहेत, ते जाणून घेऊयात. विमलेंद्र मिश्रांना अयोध्येतल्या राजघराण्याचे राजा म्हणून ओळखलं जातं. मिश्रांचेच वंशज कधीकाळी अयोध्येची व्यवस्था चालवत होते. रामजन्मभूमी ट्रस्टीत त्यांचाही समावेश करण्यात आलाय. काही वर्षांपूर्वी फैजाबादमधून मिश्रांनी बसपाकडून निवडणूकही लढवली. मधल्या काळात काँग्रेससोबत राजघराण्याचे जवळचे संबंध होते. मात्र आता ते राजकारणापासून दूर आहेत.
एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अयोध्येचे राजे विमलेंद्र मिश्रांनी म्हटलं की, अयोध्या शहरात 100 फाईव्हस्टार हॉटेल्स उभारण्यासाठी निवेदनं आली आहेत. कधीकाळी इथं काहीच व्यवस्था नव्हती, हॉटेल्सही नव्हते. राम मंदिर निर्मितीनंतर पर्यटन व्यवसायाला उभारी मिळणार आहे. मला वाटतं की सीतामातेनं अयोध्येला दिलेला शाप मागे घेतल्याचं दिसतंय.
धारणेनुसार असं मानतात की वनवासानंतर अयोध्येत जेव्हा राम परतले तेव्हा काहींनी सीतेमातेवर आक्षेप घेतले. यामुळे पुढे सीतेनं अयोध्येत कधीच भरभराट येणार नसल्याचा शाप दिला. तूर्तास आता अयोध्येत अनेक व्यावसायिकांनी गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केलीय. त्यामुळे राममंदिराबरोबरच अयोध्येत आर्थिक आणि सोयी-सुविधांचीही भरभराट येईल, अशी आशा करुयात.