
Monsoon : उन्हामुळे त्रस्त झालेले लोकं आता पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. उष्णतेमुळे लोकं हैराण झाली आहेत. त्यातच मान्सूनच्या बातमीने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण केरळमध्ये दरवर्षी पेक्षा यंदा २ दिवस आधीच मान्सूनचे स्वागत झाले आहे. साधारणपणे, मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर 5 जूनपर्यंत तो ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पोहोचतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) मान्सूनचा पहिला पाऊस 1 जून रोजी येईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु 28 मे रोजीच केरळमध्ये पाऊस झाला. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी उष्णतेने कहर केला आहे. 11 वर्षांचा विक्रम यंदा मोडला गेला आहे. उत्तर भारतात तर तापमान ५० अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे संपूर्ण देश मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता 10 किंवा 11 जूनला मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पहिला पाऊस मुंबई दाखल झाल्यानंतर येत्या ४ ते ५ दिवसात तो उर्वरित महाराष्ट्रात ( Maharashtra Weather Updates) पोहोचेल. त्यानंतर मग 27 जूनपर्यंत मान्सून देशाची राजधानी दिल्लीत दाखल होईल. दिल्लीत काल अचानक पाऊस झाला होता. येथे सर्वाधिक 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. बुधवारी दुपारी 2.30 वाजता दिल्लीतील मुंगेशपूर येथील हवामान केंद्रात 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
27 जूनपर्यंत मान्सून दिल्लीत दाखल झाल्यानंतर तो संपूर्ण भारत व्यापतो. मुंबईत 10-11 जूनच्या सुमारास मान्सूनचा पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगाल सध्या रामल चक्रीवादळाच्या प्रभावातून सावरत आहे. 10 ते 29 जून दरम्यान येथे मान्सून अपेक्षित आहे. 13 किंवा 15 जूनपर्यंत मान्सून बंगळुरूमध्ये पोहोचेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 18 ते 20 जून दरम्यान उत्तर प्रदेशात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये 13 ते 18 जून दरम्यान मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात पडण्यास सुरुवात होईल.