भाजपच्या कार्यकारिणीत नवा मुस्लिम चेहरा, राष्ट्रीय उपाध्यक्ष बनलेल्या तारिक मन्सूर यांची देशात चर्चा; कोण आहेत?
Who is Tarik Mansoor : भाजपच्या नव्या कार्यकारिणीत अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तारिक मन्सूर नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात.

भारतीय जनता पक्षाने आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्ष (उत्तर प्रदेश) ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य असलेल्या प्रा. मन्सूर यांना संघटनेतील सर्वोच्च पदांपैकी एकावर संधी देत भाजपने मोठा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशातून येणाऱ्या प्रा. मन्सूर यांची नियुक्ती संघटनेसाठी फायदेशीर ठरण्याबरोबरच आगामी निवडणुका लक्षात घेता महत्त्वाची मानली जात आहे. तारिक मन्सूर हे कोण आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोण आहेत तारिक मन्सूर?
तारिक मन्सूर यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणून नाही, तर एक प्रतिष्ठित डॉक्टर, सर्जन आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही आहे. त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून दीर्घकाळ सेवा दिली. त्यानंतर 2017 ते 2023 या कालावधीत त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. एएमयूचे कुलगुरू म्हणून त्यांचा कार्यकाळ विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्तारासाठी तसेच पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने त्यांना उत्तर प्रदेशातून विधान परिषदेत पाठवले. आता नितीन नबीन यांच्या टीममध्ये त्यांना राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी दिली असून पक्षाने त्यांच्या अनुभवावर आणि बौद्धिक क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. भाजपकडून करण्यात आलेली ही नियुक्ती आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मोठं पाऊस मानलं जात आहे.
मुस्लिम समाज आणि बुद्धिजीवी वर्गाला एकत्र जोडणार
भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत तारिक मन्सूर यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्त करणे ही पक्षाची नियोजनबद्ध रणनीती असल्याचे बोलले जात आहे. कारण भाजपने याआधीही सुशिक्षित आणि बुद्धिजीवी मुस्लिम वर्गाला आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. एएमयूसारख्या प्रतिष्ठित संस्थेचे माजी कुलगुरू आणि पेशाने डॉक्टर असलेल्या एका सुशिक्षित व्यक्तिमत्त्वाला केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देऊन भाजपने मुस्लिम समाजामध्ये आपली विश्वासार्हता वाढवण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
भाजपचे 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष
भाजपने तारिक मन्सूर यांच्यासह वसुंधरा राजे, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, एम. नागराजा आणि मधुचंद्र कर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.