VIDEO : भाजपमध्ये प्रवेश केल्याची भयंकर शिक्षा; 4 महिला TMCच्या कार्यालयात एक किलोमीटर लोळत, सरपटत गेल्या

| Updated on: Apr 08, 2023 | 12:33 PM

पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चार महिलांना पुन्हा टीएमसीत घेण्यासाठी गंभीर शिक्षा देण्यात आली. या महिलांना एक किलोमीटर जमिनीवर सरपटत येण्यास भाग पाडण्यात आलं आहे.

VIDEO : भाजपमध्ये प्रवेश केल्याची भयंकर शिक्षा; 4 महिला TMCच्या कार्यालयात एक किलोमीटर लोळत, सरपटत गेल्या
Trinamool joins BJP
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमधील एक धक्कादायक राजकीय वास्तव समोर आलं आहे. केवळ भाजपमध्ये प्रवेश केल्याचं प्रायश्चित म्हणून चार महिलांना भयंकर शिक्षा सुनावण्यात आली आहे. या चारही महिलांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत जमिनीवर लोळत, सरपटत येण्यास भाग पाडण्यात आलं. या महिलाही बालूरघाट येथून टीएमसीच्या जिल्हा कार्यालयापर्यंत एक किलोमीटरपर्यंत जमिनीवर सरपटत आल्या. त्यानंतर टीएमसीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप्त चक्रवती यांनी या महिलांना पक्षात प्रवेश देत त्यांच्या हाती झेंडा सोपवला. भाजपने तसा आरोप केला असून याबाबतचा एक व्हिडीओही सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

एक किलोमीटरपर्यंत टीएमसीच्या कार्यालयापर्यंत सरपटत गेल्यानंतर या महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला आमची चूक लक्षात आली. आम्हाला टीएमसीमध्ये यायचं होतं. त्यासाठी आम्ही जिल्हा कार्यालयात आलो. आमच्या चुकीचं प्रायश्चित घ्यायचं असल्याचं सांगितलं, असं या महिलांनी सांगितलं. त्यानंतर या महिलांना एक किलोमीटरपर्यंत सरपटत येण्यास सांगितलं आणि पुन्हा नव्याने टीएमसीत त्यांना प्रवेश देण्यात आला. भविष्यात आमच्यासोबत आणखी अनेक लोक टीएमसीमध्ये येतील, असं या महिलांचं म्हणणं आहे.

ट्विट करून टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांत मजूमदार यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. तपन गोफानगर, तपन येथील राहणारी मार्टिना किस्कू, शिउली मार्डी, ठाकरन सोरेन आणि मालती मुर्मू यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सर्व महिला एसटी प्रवर्गातील आहेत. आज टीएमसीच्या गुंडांनी या महिलांना टीएमसीत परत येण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच त्यांना दंड परिक्रमा करण्यास भाग पाडलं, असं मजूमदार यांनी म्हटलं आहे.

 

200 महिलांचं बंड

दक्षिण दिनाजपूर जिल्ह्याच्या तपन येथील गोफानगर ग्रामपंचायतीतील 200 महिलांनी गुरुवारी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप जिल्हाध्यक्ष स्वरुप चौधरी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा षष्ठी बासक भट्टाचार्य, आमदार बुधराई टुडू यांनी या महिलांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या हाती भाजपचा झेंडा दिला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने टीएमसीमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या महिलांपैकी चार महिलांना टीएमसीमध्ये प्रवेश देण्यात आला. पण प्रवेश देताना या महिलांना शिक्षा म्हणून एक किलोमीटरपर्यंत सरपटत यायला सांगितलं.

चूक उमगली

महिलांना अशा पद्धतीने शिक्षा दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, आमची दिशाभूल करून आम्हाला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही रात्रभर झोपू शकलो नाही. आमची चूक आम्हाला उमगली. त्यामुळेच आम्ही पुन्हा मूळ पक्षात आलो, असं मार्टिना किस्कू हिने सांगितलं.