BLOG : दीदी तेरा वोटर दिवाना…

BLOG : दीदी तेरा वोटर दिवाना...

मोदी-शाहा आणि केंद्रीय संस्थांच्या धाक-दपटशाला ममतादीदी पुरुन उरल्या. मोदी-शाहांनी ममतांसमोर अभूतपूर्व आव्हान निर्माण केलं होतं.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 04, 2021 | 1:05 AM

ममता बॅनर्जी… बंगालची मुलगी आणि देशाची दीदी. पश्चिम बंगालच्या जनतेवरची दीदीची मोहिनी कायम असल्याचं विधानसभा निकालानं शिक्कामोर्तब झालंय. मोदी-शाह आणि केंद्रीय संस्थांच्या धाक-दपटशाला ममतादीदी पुरुन उरल्या. मोदी-शाहांनी ममतांसमोर अभूतपूर्व आव्हान निर्माण केलं होतं. ममतांचं नेतृत्व यातून तावून सुलाखून निघालं. टीएमसीने दणदणीत विजय मिळवला. पश्चिम बंगालचं हे बावन्नकशी सोनं दोन बड्या गुजराती नेत्यांवर भारी पडलं. केजरीवालानंतर ममता बॅनर्जीच भाजपच्या या दुकलीचा प्रभावी आणि एकहाती यशस्वी सामना करु शकल्या. आज ममता बॅनर्जी याच देशातल्या सर्वात पॉवरफुल विरोधी पक्षनेत्या आहेत (TV9 Marathi Gajanan Kadam blog on Mamata Banerjee victory in West Bengal Assembly Election).

शंभर सव्वाशेची साधी स्लिपर आणि चार-पाचशे रुपयांची निळी बॉर्डर असलेली कॉटनची साडी. ममतादीदींचा हाच पेहराव देशवासीयांच्या मनात ठसलेला आहे. साध्या राहणीनं लोकांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केलं. बंगाली लोकांच्या हितासाठी काहीही करु शकते हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलंय. लोकसभेत सोमनाथ चटर्जी बोलू देत नव्हते तर त्यांच्यावरच कागदपत्रे भिरकावून देत सभागृहातून बाहेर पडल्या होत्या. 1998 ला समाजवादी पार्टी महिला आरक्षणाला विरोध करत होती. त्यांचे खासदार हौद्यात उतरुन विरोध करत होते. त्यावेळी ममतांनी खासदार दरोगाप्रसाद सरोज यांची कॉलर पकडून त्यांना फरफटत नेलं होतं.

ज्या नंदीग्राममधून त्या आज निवडून आल्या तिथूनच त्यांची पश्चिम बंगालच्या प्रादेशिक राजकारणाची नांदी झाली होती. 2007 साली डाव्या सरकारनं एसईझेडसाठी भूसंपादन केले, पण कुठलेही औद्योगिक प्रकल्प ते आणू शकले नाहीत. जमीन परत करा अशी स्थानिकांची मागणी होती. त्याचे नेतृत्व ममतांनी केले. आंदोलन चिघळलं आणि पोलीस गोळीबारात 14 लोकांचा मृत्यू झाला. 2008 मध्ये सिंगूरमध्ये टाटांच्या नॅनो प्रकल्पाला विरोध होत होता. डाव्यांच्या सरकारनं 1894 चा कायदा लावून 997 एकरांचं भूसंपादन केलं होतं. ममतांनी हे आंदोलन हाती घेतलं आणि प्रकल्प रद्द होईपर्यंत त्या लढत राहिल्या.

या दोन आंदोलनामुळं पुराणमतवादी बंगाली लोकांनी ममतांमध्ये भावी मुख्यमंत्री पाहिला. तीन वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत ममतांना अभूतपूर्व यश मिळालं आणि बुद्धदेव भट्टाचार्यांच्या रुपानं पश्चिम बंगालमधील डाव्यांचा शेवटचा मुख्यमंत्री देशानं पाहिला. 2011 साली त्यांनी पश्चिम बंगालमधला डाव्यांचा 34 वर्षांपासूनचा अभेद्य गड सर केला आणि पश्चिम बंगालची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. हा पराक्रम त्यांनी 2017 मध्येही केला आणि आता 2021 मध्येही केला. यावेळी फरक इतकाच की त्यांनी सुरक्षित मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढली आणि अटीतटीच्या लढतीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला.

ममता बॅनर्जी 1984 पासून सात वेळा खासदार म्हणून निवडून गेल्या. ममता बॅनर्जी पहिल्या रेल्वेमंत्रीसुद्धा आहेत. 1998 साली म्हणजे सोनियांनी काँग्रेसची सूत्रं हाती घेण्यापूर्वी ममतांनी काँग्रेसचा त्याग केला आणि तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. 1999 ला एनडीएमध्ये सहभागी झाल्या आणि वाजपेयींच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्रीही बनल्या. त्या देशाच्या पहिल्या महिला रेल्वेमंत्री ठरल्या. पेट्रोल दरवाढीवरुन त्यांनी 2001 मध्ये राजीनामाही दिला होता, पण पुन्हा त्या एनडीएमध्ये सहभागी होऊन मंत्री बनल्या. 2004 च्या लोकसभा आणि 2006 च्या विधानसभा निवडणुकीत ममतांना मोठा फटका बसला. त्यांनी केंद्रातल्या युपीए सरकारमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान त्यांनी नंदीग्राम आणि सिंगूरच्या आंदोलनाद्वारे लोकांच्या मनात स्थान मिळवलं आणि 2011 ला विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवलं. केंद्रीय रेल्वेमंत्रीपद सोडून त्या मुख्यमंत्री बनल्या.

नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंह अशा 90 नंतरच्या पंतप्रधानांसोबत काम करण्याचा अनुभव ममता बॅनर्जींच्या गाठीशी आहे. अटलबिहारी वाजपेयींकडून पश्चिम बंगालला हवी तशी मदत मिळत नव्हती तर त्यांनी वाजपेयींनाही हैराण करुन सोडलं होतं. वाजपेयी कोलकात्यात गेले तेव्हा ममतांच्या आईंना भेटले होते. त्यावेळी वाजपेयींनी “आप की बेटी बहुत तंग करती है” अशी गंमत वाजपेयींनी केली होती. ममता बॅनर्जी कणखर आहेत. अन्यायाविरुद्ध लढताना त्या भीडभाड ठेवत नाहीत.

5 जानेवारी 1955 चा जन्म. म्हणजे त्या आज 66 वर्षांच्या आहेत. त्या 17 वर्षांच्या असतानाच औषधोपचार मिळाले नाहीत म्हणून वडिलांचे निधन झाले. पुढे इतिहासात त्यांनी बीए आणि एम ए केलं. 1970 च्या दशकात काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली. 1975 ला जयप्रकाश नारायण यांच्याविरोधात निदर्शनं करताना त्या नारायण यांच्या कारवर चढून नाचल्या. तेव्हापासून त्या मिडीयात लोकप्रिय झाल्या. राज्य काँग्रेसच्या त्या महिला सरचिटणीस बनल्या. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या 1984 च्या निवडणुकीत त्यांनी सोमनाथ चटर्जी या माकपच्या बलाढ्य नेत्याचा पराभव करुन खासदार बनल्या. त्यावेळी त्या फक्त 21 वर्षांच्या होत्या. 1989 ला त्यांचा पराभव झाला. पण 1991 ला त्या पुन्हा लोकसभेवर निवडून गेल्या. 1996, 1998, 1999 आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी विजय मिळवत पक्क्या राजकारणी बनल्या.

विधानसभा निवडणुकीत मोदींनी “दीदी ओ दीदी” म्हणून उपहास केला. ममता जिथं जातील तिथं भाजपचे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देऊन नाउमेद करत होते. सीएएच्या मुद्यावरुन भाजपनं पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्व कार्ड वापरुन जबर ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाच्याच्या घरावर सीबीआयच्या धाडीही टाकल्या गेल्या. पण भाजपच्या या डावपेचांनी ममता खचून गेल्या नाहीत. उलट जेवढा टोकाचा द्वेष होईल तेवढ्या त्या जखमी वाघिणीसारख्या उफाळून वर आल्या. त्यामुळंच की काय ममता बॅनर्जींचा हा विजय पश्चिम बंगालपुरताच मर्यादित राहत नाही. भाजपच्या दांडगाईला त्यांनी दिलेलं उत्तर देशभरातले भाजपविरोधक आपला विजय म्हणून मिरवत आहेत. म्हणूनच आगामी काळात युपीएचं नेतृत्व ममतांकडे गेलं तर आश्चर्य वाटायला नको.

हेही वाचा : 

बंगालमध्ये प्रशांत किशोरांची भविष्यवाणी खरी ठरणार!

पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला; 6 वर्षे बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले कैलास विजयवर्गीय म्हणतात…

West Bengal Election Results 2021 | कोरोनाने हरवलं, पण मतदारांना जिंकलं, मयत उमेदवार काजल सिन्हा आघाडीवर

व्हिडीओ पाहा :

TV9 Marathi Gajanan Kadam blog on Mamata Banerjee victory in West Bengal Assembly Election

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें