
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका 2 जूनपासून प्रदर्शित झाली असून ही मालिका पहिल्या प्रोमोपासूनच तुफान चर्चेत आहे.

या मालिकेतील हिंमतरावच्या टेलर शॉपचं उद्घाटन करण्यासाठी नुकतीच अभिनेत्री सई ताम्हणकर पोहोचली होती. आता अजून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय.

प्रोमोमध्ये अभिनेत्री अलका कुबल यांना पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. प्रोमोमध्ये गोपाळ काम करत असतो आणि तेवढ्यात अलका कुबल तिथं येतात.

अलका त्याला विचारतात, "ते वर्ल्ड फेमस गोपाळराव टेलर तुम्हीच का?" यावर गोपाळ आश्चर्याने म्हणतो "अलका ताई, आमच्या गरीबाच्या दुकानावर?"

अलका ताई त्याला सांगतात की त्या माहेरच्या साडीचा ब्लाऊज शिवण्यासाठी तिथे आल्या आहेत. झी मराठीने हा प्रोमो शेअर करत लिहिलंय, "माहेरची साडी घेऊन अलका ताई येणार गोपाळ टेलरच्या दारी. मराठी मालिका विश्वातला हा महा कोलॅब" असणार आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर अलका कुबल यांची मालिकेत कोणती भूमिका असणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

अलका कुबल यांची ही झलक केवळ प्रमोशनसाठी आहे की पुढे काही मोठं सरप्राइज दडलेलं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.