
इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतलेली आहे. आतापर्यंत अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वाच्या स्थळांवर हल्ले केलेले आहेत. तर दुसरीकडे इराणनेही आखाती देशांत असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे.

या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे लाखो डॉलर्स खर्च झाले आहेत. परंतु जोपर्यंत आम्ही इराणमध्ये तेथील लोकांना हवे असलेल्या सरकारची स्थापना करणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आहे.

दरम्यान, अमेरिका एकीकडे इराणविरोधातील युद्धात अडकलेली असताना दुसरकीकडे याच देशात निसर्गाचा कोप झाला आहे. इथे आलेल्या मोठ्या वादळामुळे तसेच तुफान पावसामुळे अमेरिकेचे 1 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत शुक्रवारी कोना नावाचे वादळ आले. या वादळासोबत तिथे मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला. अमेरिकेच्या हवाई राज्यातील ओआहूच्या उत्तरेत हे वादळ झडकले. रात्रीच्या अंधारात या वादळाने चांगलेच थैमान घातले.

अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पावसामुळे त्या भागातील रस्ते जलमय झाले. तसेच अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली. काही घरांतही पाणी घुसले. या नैसर्गिक संकटामुळे अमेरिकेचे एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात अमेरिकेत धडकलेले हे दुसरे वादळ आहे.