Post Office Schemes : शेअर बाजाराचा धोका नको? मग पोस्ट ऑफिसच्या या 5 योजनांमध्ये गुंतवा पैसे, होईल लाखोंचा फायदा
शेअर बाजारातील चढ-उतार टाळून बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सरकारी योजनांचा विचार करता येतो. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून योग्य व्याजदराचा फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या त्या कोणत्या योजना आहेत. याबद्दल जाणून घ्या सविस्तर

शेअर बाजारात पैश्यांची गुंतवणूक करताना कधी नफा होतो, तर कधी नुकसानही सहन करावं लागतं. त्यामुळे बचतीवर बाजारातील या चढ- उतारांचा प्रचंड परिणाम होतो.
अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या काही सरकारी बचत योजना उपयोगी ठरू शकतात. या योजनांमध्ये ठराविक काळासाठी गुंतवणूक करून लाखोंमध्ये व्याज मिळवता येतं. सध्या काही योजनांवर 7.1 टक्क्यांपासून 8.2 टक्क्यापर्यंत वार्षिक व्याज दिलं जात आहे.
सुकन्या समृद्धी योजना :मुलीच्या भविष्यासाठी बचत करू इ्च्छिणाऱ्या पालकांना सुकन्या समृद्धी योजनेचा विचार करता येईल. या योजनेवर सध्या वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळतं. मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने खातं उघडता येतं. एका आर्थिक वर्षात किमान 250 रूपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रूपये जमा करता येतात. ही दीर्घकालीन योजना असून पैसे काढण्याचे आणि मुदतपूर्तीचे नियम लागू होतात
पब्लिक प्रोव्हिडंट फंड : दीर्घकालीन बचतीसाठी PPF हा एक पर्याय आहे. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असून सध्या यावर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळतं. एका आर्थिक वर्षात किमान 500 रूपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रूपये जमा करता येतात. नियमांनुसार या योजनेत करसवलतीचाही लाभ मिळू शकतो.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट :5 वर्षांसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा पर्याय योग्य आहे. या योजनेवर सध्या वार्षिक 7.7 टक्के व्याज मिळतं. गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील व्याज योजनेच्या नियमांनुसार मुदतपूर्वीच्या वेळी मिळतं. पात्र गुंतवणूकीवर आयकर सवलतीनुसार करसवलत मिळू शकते
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्किम (MIS ):दर महिन्याला नियमित उत्पन्न हवं असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरू शकते. या योजनेवर सध्या वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळतं आणि व्याजाची रक्कम दर महिन्याला दिली जाते. खाते उघडताना एकरकमी गुंतवणूक करावी लागते. एकट्याच्या खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रूपये तर संयुक्त खात्यात 15 लाख रूपये गुंतवता येतात.याचा कालावधी 5 वर्षांचा असतो.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट :बँकेतील मुदत ठेवीप्रमाणे पोस्ट ऑफिसमधेही ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवता येतात. 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या मुदतीचे पर्याय उपलब्ध आहेत. सध्या मुदतीनुसार 6.9 टक्के ते 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळतं. 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर 7.5 टक्के व्याज दिलं जातं
गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा :पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये सरकारकडून ठरवलेले व्याजदर लागू होतात. मात्र सर्व योजनांचे नियम, कालावधी, गुंतवणूकीची मर्यादा आणि करसवलती एकसारख्या नाहीत. व्याजदरांचा सरकारकडून दर 3 महिन्यांनी आढावा घेतला जातो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी सध्याचे दर आणि योजनेच्या अटी तपासून घ्या