पडद्यावरच्या निरागस भूमिकांनी जिंकली मनं, बालकलाकार म्हणून गाजले, आज कुठे आहेत हे स्टार्स ?
बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून गाजलेले अनेक स्टार्स आज कुठे आहेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. काही जणांनी अभिनयातच आपले करिअर यशस्वीपणे पुढे नेले, तर काही जणांनी ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर जात शिक्षण, व्यवसाय, मॉडेलिंग किंवा ओटीटीसारख्या क्षेत्रांची निवड केली. परझान दस्तूर ते दर्शील सफारीपर्यंत, तुमच्या आवडत्या बालकलाकारांच्या आजच्या प्रवासाची ही खास झलक.

बॉलिवूडमध्ये अनेक बालकलाकारांनी आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. काहींनी पुढे अभिनय क्षेत्रातच आपली कारकीर्द घडवली, तर काहींनी ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर जात शिक्षण, व्यवसाय किंवा इतर क्षेत्रांची वाट निवडली. जाणून घेऊया अशाच काही लोकप्रिय बालकलाकारांबद्दल.. ( All Photos : Social Media)
दर्शील सफारी - आमिर खानच्या सर्वांत दमदार चित्रपटांपैकी एक म्हणजे 'तारे जमीन पर' या चित्रपटात अभिनेता दर्शील सफारीनं (Darsheel Safary) ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील दर्शीलच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटात क्यूट वाटणारा दर्शील आता हँडसम हंक झाला आहे. चित्रपटानंतर दर्शीलने काही टीव्ही शोजमध्ये काम केलं. याशिवाय तो काही जाहिरातींमध्येही झळकला.
हंसिका मोटवानी - हंसिका मोटवानीने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून टीव्ही आणि बॉलिवूडमधून केली. कोई... मिल गयामधील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला आणि तमिळ तसेच तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. आज हंसिका दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
अहसास चन्ना - अभिनेत्री अहसास चन्नाने बालकलाकार म्हणून कभी अलविदा ना कहना, माय फ्रेंड गणेशा यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. पुढे तिने डिजिटल आणि ओटीटी विश्वात आपली कारकीर्द पुढे नेली. गर्ल्स हॉस्टेल, कोटा फॅक्टरी आणि मिसमॅच्ड यांसारख्या चर्चेत राहिलेल्या वेब सीरिजमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
परज़ान दस्तूर - 1998 मध्ये रिलीज झालेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील छोट्या सरदाराची भूमिका साकारणारा परजान दस्तूर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. “तुस्सी जा रहे हो?” हा त्याचा छोटासा संवाद तर बॉलिवूडमधील संस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. चित्रपटांसोबतच परजानने अनेक लोकप्रिय टीव्ही जाहिरातींमध्येही काम केलं. बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतरही तो आपल्या वैयक्तिक आयुष्याची आणि सर्जनशील कामांची झलक सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
जिब्रान खान - कभी खुशी कभी ग़ममध्ये शाहरुख खान आणि काजोल यांच्या मुलाची, कृष्णाची भूमिका साकारणारा जिब्रान खान बालकलाकार म्हणून घराघरात पोहोचला होता. काही काळ अभिनयापासून दूर राहिल्यानंतर त्याने पुन्हा मनोरंजनविश्वात पाऊल ठेवलं. आता तो अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. फिटनेस, डान्स आणि स्क्रीन प्रेझन्समुळे तो सोशल मीडियावरही चर्चेत असतो. नव्या पिढीतील प्रेक्षक त्याला अभिनेता म्हणून नव्या रूपात पाहत आहेत.
आयशा कपूर - संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटात छोटी मिशेलची भूमिका साकारून आयशा कपूरने आपल्या अभिनयाची छाप पाडली. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. मात्र, त्यानंतर आयशाने अभिनयापासून काहीसं अंतर ठेवत आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. पुढे तिने व्यवसाय आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज ती मनोरंजनविश्वापासून काहीशी दूर राहून आपल्या व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करते.
झनक शुक्ला - कल हो ना हो आणि लोकप्रिय टीव्ही शो करिश्मा का करिश्मा यांसारख्या प्रोजेक्ट्समधून झनक शुक्लाने बालकलाकार म्हणून मोठी लोकप्रियता मिळवली. तिच्या निरागसपणासोबतच नैसर्गिक अभिनयाचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं. मात्र, मोठं होत असताना तिने अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं. सध्या ती अधूनमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.