
'साथ निभाना साथियाँ' या लोकप्रिय मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. देवोलीनाने नुकतंच मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर तिने गृहप्रवेशाचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमधील देवोलीनाच्या पतीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. कारण देवोलीनाचा पती शाहनवाज शेख हा मुस्लीम असून त्याने हिंदू पद्धतीनुसार गृहप्रवेशाच्या सर्व विधी पार पाडल्या आहेत. यावेळी त्याच्या हातात देवाची मूर्तीसुद्धा पहायला मिळतेय.

गृहप्रवेशाचे हे फोटो पोस्ट करत देवोलीनाने लिहिलं, 'काही स्वप्नांना पूर्ण होण्यासाठी वेळ, हिंमत आणि खूप जास्त विश्वास लागतो. आज माझ्या स्वप्नांच्या घरात उभं राहिल्यानंतर माझ्या मनात अनेक भावना उफाळून आल्या आहेत. या प्रवासासाठी, शिकवणीसाठी आणि आशीर्वादासाठी मी आभारी आहे.'

देवोलीनाच्या या पोस्टवर टीव्ही इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पवित्रा पुनियासह अनेक सेलिब्रिटींनी या फोटोंवर कमेंट्स केले आहेत. नेटकऱ्यांनीही तिचं कौतुक केलं आहे. 'हेच संस्कार असतात. कोणत्याही धर्मात लग्न केलं तरी स्वत:च्या धर्माला विसरली नाही', असं एकाने लिहिलं.

तर काहींनी देवोलीनाच्या पतीचंही कौतुक केलं. 'मुस्लीम असूनही पत्नीच्या धर्माप्रमाणे सर्व विधी केले, खरंच कौतुक करायला हवं', असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. एका फोटोमध्ये देवोलीनाच्या डोक्यावर कलश आणि तिच्या पतीच्या हातात देवाची मूर्ती पहायला मिळतेय.

आणखी एका फोटोमध्ये दूध उतू घालण्याचीही विधी करताना दिसत आहेत. यासोबतच देवोलीना हवन करताना आणि तिचा पती नारळ-कापराने घराची नजर काढताना दिसत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.