
डोंबिवलीतील ओम इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी यशस्वी शैलेश देसाई हिने आयसीएसई (10 वी) बोर्ड परीक्षेत तब्बल 97.80 टक्के गुण मिळवत उत्तुंग यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे यशस्वीने कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करत हे यश संपादन केले असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आयसीएसई बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेत डोंबिवलीतील यशस्वी शैलेश देसाई हिने 97.80 टक्के गुण मिळवले. ओम इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या यशस्वीने कोणत्याही क्लासचा आधार न घेता घरीच अभ्यास करून यशाची ही कमान गाठली.

या यशाचे श्रेय यशस्वीने तिचे आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले

यशस्वीला अभ्यासाबरोबरच चित्रकलेचीही विशेष आवड आहे. ती घरी बसून वेळ मिळेल तसा स्केचिंग आणि रंगकाम करते.

तिच्या आई-वडिलांना तिचा हा कल खूप आवडतो आणि ते नेहमीच तिला प्रोत्साहन देतात. यशस्वीच्या वडिलांचा व्यवसाय इलेक्ट्रिशियनचा असून आई गृहिणी आहे. तिची धाकटी बहीणही हुशार असून ‘मी सुद्धा ताईसारखी गुण मिळवेन,’ असे ती सांगते.

“लहानपणापासून यशस्वी अभ्यासात खूपच हुशार आहे. घरी आली तरी अभ्यास करतच असते. तिला व्हॉलीबॉलचा खेळ खूप आवडतो आणि ती आपल्या शाळेच्या संघाची कॅप्टनही होती” असे तिची मामेबहीण ज्ञानश्री गदरे हिने यशस्वीच्या यशावर आनंद व्यक्त करत सांगितले.

यशस्वीचे ध्येय पुढे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे असून, तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी ती सातत्याने मेहनत करत राहणार आहे. तिच्या या यशामुळे डोंबिवलीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.