
दोडामार्ग वीजघर मार्गावर बांबर्डे येथे मध्यरात्री एका वाहनचालकाला पाच हत्तींचा कळप दिसला. त्यात तीन पिल्ले आहेत. एक पिल्लू तर वयाने अगदीच लहान आहे. तिलारी खोऱ्यात वावरणाऱ्या हत्तींची संख्या वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असले तरी पर्यावरणवादी मात्र समाधान व्यक्त करत आहेत.

हत्तींचा कळप बहुतेक वेळा रात्रीच्या वेळी रस्ता क्रॉस करतो. वाहनांची वर्दळ, माणसांचा गलका कमी झाला की शांत वातावरणात ते आपले मुक्कामाचे ठिकाण बदलतात. काही वर्षांपुर्वी पाळ्ये तिठ्यावर रात्रीच्या वेळी आठ दहा हत्तींचा कळपही लोकांना पाहिला आहे. दीड दोन वर्षांपुर्वी लॉकडाऊन काळात सगळी माणसे घरात असायची तेव्हा हत्तींचा प्रवास बांबर्डे भागातील रस्त्यावरुन दिवसा सुध्दा पाहायला मिळाला आहे. रस्त्यावर वर्दळ नसताना, सगळी सामसूम असताना हत्तींची ये जा नित्याचीच झाली आहे.

वीजघर राणेवाडी येथील संदेश दौलत राणे सोमवारी मध्यरात्री बोलेरो गाडीने दोडामार्गहून घरी जात होते. त्यांच्या घराच्या अलिकडे त्यांना पाच हत्तींचा कळप रस्त्यावरून चालताना दिसला. गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात त्यांनी त्या कळपाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले.

काही वेळाने तो कळप हळू हळू चालत उजव्या बाजूच्या झाडीत उतरला. मागच्या वेळेला तिलारी खोऱ्यातील अनेक गावात दोन पिल्ले आणि दोन हत्तींच्या कळपांचा वावर होता.त्या कळपात आता आणखी एका नव्या पाहुण्याची भर पडलेली दिसते.

त्या कळपाव्यतिरिक्त आणखी एक टस्कर तिलारी खोऱ्यातील गावांमध्ये वावरत आहे.त्यामुळे सहा हत्तींच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे अनेक वेळा हत्तींनी घुसून नुकसानही केले आहे. त्यामुळे त्यांना हत्ती नवा नसला तरी अचानक रस्त्यात हत्तींचा कळप पाहून ते चिंताग्रस्त झाले.