
कच्चाथिवू : एकेकाळी भारताच्या मालकीचे असलेले कच्चाथिवू बेट आता श्रीलंकेच्या ताब्यात आहे. हे बेट भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे.

ऐतिहासिक मालकी : सुरुवातीला हे बेट रामनाथपुरमच्या (तमिळनाडू) राजाच्या अखत्यारीत होते. ब्रिटीश काळातही या बेटावर भारताचा प्रभाव होता.

हस्तांतरण : 1974 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके यांच्यात एक करार झाला. या 'भारत-श्रीलंका सागरी सीमा करार' अंतर्गत भारताने हे बेट सदिच्छा म्हणून श्रीलंकेला सोपवले.

मच्छिमारांचा प्रश्न : या बेटावर श्रीलंकेचा ताबा असूनही, भारतीय मच्छिमारांना तिथे जाळी सुकवण्याची आणि तिथल्या 'सेंट अँथनी' चर्चच्या वार्षिक उत्सवात सहभागी होण्याची परवानगी आहे. मात्र, तिथल्या पाण्यात मासेमारी करण्यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात वारंवार वाद होतात.

राजकीय वाद : धोरणात्मक आणि राजकीय दृष्टीने महत्तावाचे असणारे हे बेट भारतात सामील करण्याची मागणी तमिळनाडू सरकार आणि अनेक राजकीय पक्ष वारंवार करत असतात.