‘हनुमान अंश’सारखा ब्लॉकबस्टर, 18 दिवसांत बजेटच्या 1966 टक्के अधिक कमाई; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका
या चित्रपटाला 'हनुमान अंश'सारखंच यश मिळालं आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच जबरदस्त नफा कमावला आहे. मोठ्या बजेटच्या चित्रपटांशी स्पर्धा करताना छोट्या चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती मिळू शकते, हे या सिनेमाने दाखवून दिलं आहे.

चित्रपट सुपरहिट होण्यासाठी मोठे स्टार, कोट्यवधींचं बजेट आणि जाहिरातींवर होणारा भरमसाठ खर्च आवश्यक असतो, असं अनेकदा मानलं जातं. मात्र, 'हनुमान अंश'ने हे समीकरण बदलून दाखवलं होतं. त्यानंतर आता आणखी एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अशीच धमाकेदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘प्रेमदा ऊराली’.
अवघ्या अडीच कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर केवळ 18 दिवसांत 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, सुरुवातीला या चित्रपटाला मोजकेच शो मिळाले होते. मात्र, प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्याच्या कमाईत मोठी वाढ झाली. कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाप्रमाणेच ‘प्रेमदा ऊराली’नेही बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवत चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘प्रेमदा ऊराली’ हा कन्नड भाषेतील चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केलं आहे. सुरुवातीला चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र होतं. पहिल्या दिवशी केवळ 60 शो मिळाले, तर कमाईही अवघी नऊ लाख रुपये होती. मात्र, पुढील काही दिवसांत चित्रपटाची लोकप्रियता वाढू लागली.
या चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीच्या आधारे चित्रपटाने बजेटच्या तुलनेत सुमारे 1966 टक्के अधिक कमाई केली आहे. ‘प्रेमदा ऊराली’च्या यशामागे प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रिया हे महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. चित्रपटाच्या टीमने मोठ्या जाहिरात मोहिमेऐवजी लोकांपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबले.
लग्नाच्या आमंत्रणपत्रिकांसारखी पत्रकं तयार करून ती लोकांमध्ये वाटण्यात आली. या अनोख्या प्रचारपद्धतीमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटात रंगायन रघू, श्री राम, तपस्विनी पूनाचा आणि रामिका शिवू यांसारखे कलाकार आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात कौटुंबिक नाती, प्रेम आणि भावनिक गुंतागुंत दाखवण्यात आली आहे.
कमी बजेटमध्ये तयार होऊन अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवणाऱ्या ‘हनुमान अंश’ या हिंदी चित्रपटासोबतही ‘प्रेमदा ऊराली’ची तुलना केली जात आहे. ‘हनुमान अंश’नेही सुरुवातीच्या मर्यादित कमाईनंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली होती.