आरे..आरे.., ना सूर, ना ताल, ना कोणता सुप्रसिद्ध गायक, तरीही हे गाणं 15 वर्षांपासून प्रत्येक पार्टीत वाजतं
आरे..आरे..., ना सूर, ना ताल, ना कोणताच प्रसिद्ध गायक. तरी गेल्या 15 वर्षांपासून प्रत्येक लग्न, पार्टीमध्ये वाजवलं जातं हे गाणं. इतकं सुपरहिट की प्रत्येकजण धरतो ठेका.

बॉलिवूडमधील अनेक गाणी लग्नसमारंभांची शान ठरली आहेत. मात्र, एक असे गाणे आहे ज्याला ना सूर, ना ताल आणि ना कोणत्या प्रसिद्ध गायकाचा आवाज आहे. तरीही ते गाणं गेल्या 15 वर्षांपासून सोशल मीडियासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

हे गाणे लग्न, पार्टी आणि बँडबाजामध्ये आवर्जून वाजवले जाते. ते म्हणजे 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देव डी' चित्रपटातील 'इमोशनल अत्याचार'. या गाण्यामागची कहाणीही तितकीच वेगळी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना पारंपरिक प्रेमगीत नको होते.

नायकाच्या भावनिक गोंधळाची आणि तुटलेल्या नात्याची मांडणी करणारे, लग्नातील ब्रास बँडच्या धाटणीतील गाणे त्यांना हवे होते. त्यानुसार संगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी केवळ संदर्भासाठी स्वतःच्या आवाजात एक स्क्रॅच ट्रॅक रेकॉर्ड केला.

सुरुवातीला हे गाणे एखाद्या व्यावसायिक गायकाकडून रेकॉर्ड करण्याची योजना होती. मात्र, अनुराग कश्यप यांनी स्क्रॅच ट्रॅक ऐकताच तोच अंतिम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्या रफ आणि नैसर्गिक आवाजातच गाण्याचा खरा भाव जाणवला.

विशेष म्हणजे, त्या काळात गायक म्हणून स्वतःची वेगळी प्रतिमा तयार व्हावी, या उद्देशाने अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्यासाठी स्वतःची खरी नावे न वापरता 'बँडमास्टर रंगीला आणि रसीला' हे काल्पनिक नाव वापरले. त्यामुळे अनेक वर्षे हे गाणे नेमके कोणी गायले, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.